रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस चांगलाच सक्रीय झाला आहे. दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदा दमदार पाऊल झाला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी हे धरण भरलं आहे. जयकवाडीसह मराठवाड्यातील अनेक लहान-मोठी तसंच मध्यम आकाराची धरणं आणि बंधारे भरले आहेत. नद्यांनाही चांगलं पाणी असल्याचं ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होतीय का अशी भीती सतावू लागली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख महानगरांना बुधवारी (25 सप्टेंबर) पावसानं जोरदार झोडपलं.
हा परतीचा पाऊस नाही
राज्यात सध्या परतीचा पाऊस सुरु आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण, हा पाऊस परतीचा नसल्याची माहिती पुणे वेधशाळेचे व्यवस्थापक डॉ. एस.डी. सानप यांनी दिली आहे. देशात आत्तापर्यंत पंजाबमधील काही भाग, राजस्थान तसंच कच्छसह गुजरातमधील काही भागातील मान्सून परतला आहे. उर्वरित देशात पाऊस तसाच आहे, असं सानप यांनी स्पष्ट केलं. राज्यातील परतीच्या पावसाची स्थिती निर्माण झाल्यावर
त्याबाबत माहिती दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
कसं असेल राज्यातील हवामान?
पुणे जिल्ह्यात आज (गुरुवार, 26 सप्टेंबर) ऑरेंज अलर्ट तर पुणे शहराला हवामान खात्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्यापासून (शुक्रवार) पुणे जिल्ह्यासाठी तसंच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून सध्या सुरु असलेल्या पावसाचा जोर कमी होईल, असा दिलासा सानप यांनी दिला.
( नक्की वाचा : Pune Rain : पुणेकरांना जोरदार पावसानं झोडपलं, पुढील 24 तास रेड अलर्ट )
पुण्यात पावसानं रेकॉर्ड मोडला
पावसाने गेल्या 86 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितानुसार शिवाजीनगरमध्ये 24 तासांत 133 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महत्वाची बाब ही आहे की यातील 124 मिलीमीटर पाऊस हा 2.30 ते संध्याकाळी 5.30 या 3 तासांत झाला होता. बुधवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत शिवाजीनगर भागात तब्बल 133 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात 24 तासांत झालेल्या पावसाचा विक्रम यापूर्वी 1938 साली नोंदवण्यात आला होता. त्यावर्षी 24 तासांत 132.3 मिमी पाऊस झाला होता. सप्टेंबर 2024 मध्ये 24 तासांत 133 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.