गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून राज्यात पुन्हा एकदा जोरदार सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवेत वाढलेले बाष्पाचे प्रमाण आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेली अनुकूल वातावरणीय परिस्थिती यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि उत्तर कोकणातील काही भागात पावसाने आधीच चांगली हजेरी लावली असून, आता उर्वरित महाराष्ट्रातही पावसासाठी पूरक परिस्थिती तयार होत आहे.
कोकण आणि मुंबई परिसरात हलका ते मध्यम पाऊस
राज्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये पावसाचा जोर खालीलप्रमाणे राहण्याचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Rohit Sharma: रोहितच्या वनडे कारकिर्दीचा शेवट? 'या' खेळाडूसाठी निवृत्ती घ्यावी लागणार? BCCI वर नाराज)
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात यलो अलर्ट
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावेल. तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात मध्यम पावसाचा अंदाज आहे. सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
(नक्की वाचा- DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)
विदर्भात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार
विदर्भातील हवामानातही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. येथील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी लागण्याचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world