Rain Alert: जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशांत महासागरातील 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील मान्सूनची गती काहीशी मंदावली होती. परंतु, आता राज्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील खालील भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड, ठाणे, पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक घाट विभाग, सातारा घाट विभाग, सांगली, सोलापूर आणि धाराशीव या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, पालघर, पुणे शहर, नाशिक शहर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड. या भागात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
(नक्की वाचा- DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)
सध्या राज्यातील काही भागात हवामान कोरडे असून उष्ण व दमट वातावरण जाणवत आहे. मात्र, शनिवारपर्यंत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस हजेरी लावेल. मध्य महाराष्ट्रात या काळात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे आणि कोकण विभागाची स्थिती
पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान विभागाने विशेष अंदाज जाहीर केला आहे. पुण्यात पुढील 3 ते 4 दिवस आकाश प्रामुख्याने अंशतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट माथ्यावर जाणाऱ्या पर्यटकांनी आणि नागरिकांनी बदलत्या हवामानाचा विचार करून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे, कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद होऊ शकते, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
(नक्की वाचा- Pimpri Chinchwad News: "आई मी नदीत उडी मारतोय..."; रात्रीच्या वेळी लंडन ब्रिजवर उभं राहून व्हिडीओ कॉल, अन्...)
देशातील 15 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागात पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. हवामान विभागाने देशातील 15 राज्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, मणिपूर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.