'एक होतं माळीण...'; दहा वर्षांनंतरही जखम भळभळतेय; कशी आहे सद्यस्थिती?

ही घटना पहिल्यांदा समोर आली ती एका एसटी ड्रायव्हरमुळे आणि इथून पुढे प्रशासनासह सगळ्यांचीच धावपळ उडाली.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील घडलेल्या एक घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता. रात्री गाढ झोपेत असताना काळााने घाला घातला आणि हसतं-खेळतं टुमदार गाव उद्ध्वस्त झालं. तब्बल 151 गावकऱ्यांनी झोपेतच शेवटचा श्वास घेतला. ही बाब पसरताच महाराष्ट्र हादरून गेला होता.  

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या माळीणची दुर्घटना अनेकांच्या आयुष्यात कायमची व्रण ठेवून गेली. आज या घटनेला दहा वर्ष पूर्ण झाली. मात्र अजूनही या भागातील आदिवासी जनतेच्या मनातून त्या घटनेची भीती कायम आहे. 151 बांधवांचा जीव घेणारी ही दुर्घटना शत्रूच्याही वाट्याला येऊ नये अशीच मागणी कोणाकडूनही केली जाईल.

या ठिकाणी माळीण गावाचं पुनर्वसन तर झालं मात्र जी माणसं गेली जे गाव याच्यामध्ये संपूर्ण नष्ट झालं त्याच्या आठवणी अजूनही तशाच आहेत. मंचरकडून आहुपे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डिंभे धरणाच्या अगदी आत सत्तावीस किलोमीटरवर असणार छोटसं माळीण गाव...एरवी कधीही कोणाच्या लक्षातही आलं नसतं मात्र या गावावर दरड कोसळली आणि एक नवे दोन नव्हे तर तब्बल 151 लोक यात गाडली गेली. ही घटना जेव्हा जगासमोर आली तेव्हा जग निश्चितच हळहळत होतं.. मात्र ही घटना पहिल्यांदा समोर आली ती एका एसटी ड्रायव्हरमुळे आणि इथून पुढे प्रशासनासह सगळ्यांचीच धावपळ उडाली.

या घटनेतून वाचलेला दोन महिन्यांचा रुद्र...
सर्वत्र एकच आक्रोश सुरू असताना येथील एका घरातील लहानग्याने आपल्या आईला घट्ट मिठी मारली होती.  इथे मदत कार्य करणाऱ्या तरुणांच्या नजरेला हे दृश्य पडलं...त्यांनी ताबडतोब हालचाल करून ढिगार्‍या खालून आईला दोन महिन्यांच्या रुद्रासह बाहेर काढलं. आता हा रुद्र पाचवीमध्ये आहे. अशा एक ना अनेक कहाण्या या माळीनच्या दुर्घटनेसोबत जोडल्या गेल्या आहेत. आता या रुद्रला त्या आठवतही नाहीत. मात्र याच्या सारखीच अनेक लहान मुलं या कथा ऐकत मोठी होत आहेत.

Advertisement

नक्की वाचा - केरळच्या वायनाडमध्ये 'माळीण'ची पुनरावृत्ती, भूस्खलनामुळे 24 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक अडकल्याची भीती

दिलीप लेंभे हे पत्नी, भाऊ, भावजय आणि त्यांची चार मुले यांच्यासह माळीणमध्ये राहत होते. डोंगर कुशीमध्ये असणाऱ्या भात शेतीवरच ते पोटाची खळगी भरत होते.  त्या दिवशी सकाळी भात शेतीच्या काही कामासाठी ते बाहेर पडले आणि हा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबातील तब्बल दहा जणांचा जीव गेला. 

आजही या डोंगर कपाऱ्यांमधील अशीच काही गावं आजही भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. नुकतेच माळीणच्या वरच्या बाजूला असलेल्या कुंभेवाडी जवळील घाटामध्ये दरड कोसळली होती. अशाच पद्धतीच्या छोट्या मोठ्या दरडी या भागात कोसळत असतात. जेव्हा अधिकचा पाऊस होतो तेव्हा येथील गावकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे प्रशासनाने डोंगर कुशीमध्ये असणाऱ्या गावांची वेळीच दखल घेणं देखील गरजेचे आहे. पुन्हा असं माळीण होणं आपल्याला परवडणार नाही.

Advertisement