Mumbra illegal Parking Video Viral : मुंब्रा परिसरात अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. ठाणे ट्रॅफिक विभागाने यावर उपाययोजना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती.बेकायदेशीरपणे पार्किंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. मुंब्रा स्टेशनपासून शिलफाट्यापर्यंत नो-पार्किंग बोर्ड लावणे,अनावश्यक कट आणि यू-टर्न बंद करणे,तसेच नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतही निर्णय घेण्यात आले होते.
मुंब्र्यातील अवैध पार्किंगवर कारवाई कधी होणार?
तसच मॅरेज हॉलबाहेरही गाड्यांची पार्किंग टाळण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, मुंब्र्यात अजूनही अवैध पार्किंग सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्यालगत लावलेल्या गाड्यांवर टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केल्याचा व्हिडीओ समोर आलाय. परंतु, एका तरुणीने याच टोईंग व्हॅनवर ठेवलेली वाहने खाली पाडून त्याची दुचाकी ताब्यात घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय.तरुणाच्या दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
इथे पाहा मुंब्र्यातील तो धक्कादायक व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता, टोईंग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी मुंब्र्यातील बाजारपेठेत अवैध पार्किंगवर कारवाई करत असतात. यावेळी हे कर्मचारी रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीरपणे लावलेल्या गाड्या टोईंग व्हॅनवर ठेवत असल्याचं व्हिडीओत दिसतं. पण त्याचदरम्यान, एक तरुण कायदा हातात घेत या कर्मचाऱ्यांसोबत उद्धटपणे वागतो आणि त्यांच्यावर दादागिरी करून टोईंग व्हॅनवर ठेवलेली गाडी खाली उतरवतो. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आता वाहतूक पोलीस या व्यक्तीवर काय कायदेशीर कारवाई करतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.