Manoj Jarange Maratha Morcha : मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंचा निर्धार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि कायद्याच्या चौकटीत सुरू आहे. ते म्हणाले की, सरकार जरी गरीब लोकांकडे दुर्लक्ष करत असेल, तरी न्यायव्यवस्था नक्कीच न्याय देईल. तसेच मागण्या मान झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. न्यायालयात या आंदोलनावर झालेल्या सुनावणीनंतर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, 'आम्ही शांततामार्गाने आंदोलन करत आहोत. आम्ही लोकशाही, कायदा आणि न्यायालयाला सोडून कधीही काम केले नाही, आजही काम करत नाही. आम्ही गरीब लोकांच्या मागण्यांकडे न्यायदेवता लक्ष देईल. सरकार गोरगरिबांना विचारत नसेल, तर त्यांची काळजी घेणारे न्यायालय असते.  न्यायदेवता आपल्या वेदनेत सहभागी होईल आणि गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे काम करेल.

(नक्की वाचा-  Manoj Jarange Maratha Morcha: आझाद मैदान तातडीने रिकामे करा, पोलिसांनी जरांगेंच्या समितीला बजावली नोटीस)

मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही

मराठा आंदोलनावर बोलताना जरांगे पाटील यांनी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. 'जर सरकारने आमच्या विरोधात अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. सातारा आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, त्याच्या जीआर शिवाय मुंबईतून जाणार नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

मी मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही. त्यानंतरची दुष्पपरिणाम सरकार बघून घेईल. मागण्या मान्य होण्यासाठी कुठल्याही थराला जायचं झालं तर मी मागे हटणार नाही. मराठे काय असतात ही साडे तीनशे वर्षांनंतर पाहायचं असेल, तर माझा नाईलाज आहे, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Advertisement

(नक्की वाचा-  Maratha Quota Protest: रस्त्यावर शौचाला बसण्यापासून आत्महत्येच्या धमकीपर्यंत,आंदोलकांकडून 11 अटींचे उल्लंघन)

'मुंबईत आता कुठेही ट्रॅफिक नाही'

न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री रस्त्यावरील सर्व वाहने काढण्यात आली आणि रस्त्यावर एकही गाडी ठेवण्यात आली नाही. यापेक्षा न्यायालयाच्या आदेशाचे आणखी काय पालन करायला हवे? आता मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी नाही. पुढील काळातही न्यायदेवता जे सांगेल, त्याचे आम्ही पालन करू, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

साडेतीनशे वर्षांनंतर मराठे काय असतात ते कळेल

जरांगे पाटील यांनी सरकारवर मराठ्यांचा अपमान करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'तुमच्या नेत्यांना देखील महाराष्ट्रात यायचं आहे, त्यामुळे मराठ्यांचा प्रश्न सोडवा, त्यांचा अपमान करू नका. उगाच आझाद मैदानातुन किंवा मुंबईतून हाकलून देऊ अशा वल्गना करू नका. नाहीतर 350 वर्षानंतर मराठे काय असतात ते पुन्हा कळेल, असा इशारा देखी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Advertisement

Topics mentioned in this article