मराठीतील प्रसिद्ध लेखक, कवी पद्मश्री नारायण सुर्वे (Famous writer Padmashri Narayan Surve) यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र आपण चोरी करीत असलेलं घर नारायण सुर्वेंचं असल्याचं कळताच चोराला आपली चूक लक्षात आली आणि त्याने एक चिठ्ठी लिहून माफी मागितली. याशिवाय चोरलेल्या सर्व वस्तू घरात पुन्हा आणूनही ठेवल्या. पोलिसांनी मंगळवारी 16 जुलै रोजी या घटनेची माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे नारायण सुर्वे यांच्या घरातील अनेक महागड्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. मात्र सुर्वेंच्या कवितेची ताकद इतकी अवघ्या काही क्षणात चोराला आपली चूक लक्षात आली.
मुंबईत जन्मलेले नारायण सुर्वे एक प्रसिद्ध मराठी कवी आणि सामाजिक कार्यकर्ते होते. शहरातील मजूर वर्गाचा संघर्ष शब्द आणि कवितेच्या माध्यमातून पोहोचवणारे, कामगारांच्या शोषणाविरूद्धचा आक्रोश मांडणारे नारायण सुर्वे यांचं 16 ऑगस्ट 2010 मध्ये 84 व्या वर्षी निधन झालं. त्यांची मुलगी सुजाता आणि तिचे पती गणेश घारे हे नेरळच्या घरी राहतात. दोघेही विरारला मुलाच्या घरी गेले होते, त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून त्यांचं घर बंद होतं.
नक्की वाचा - आयपीएसचं होतं स्वप्न, पण 12 व्या वर्षी ओढवला मृत्यू; 4 जणांना नवं आयुष्य देऊन गेली वैदेही!
अन् घरात घुसला चोर...
यादरम्यान त्यांच्या घरात चोर घुसला. त्याने एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी असंच काही सामान चोरी केलं. दुसऱ्या दिवशीही तो पुन्हा सुर्वेंच्या घरी चोरी करण्यासाठी आला. यावेळी दुसऱ्या खोलीत तो चोरी करण्यासाठी आला तेव्हा त्याला खोलीत नारायण सुर्वेंचा फोटो आणि त्यांना मिळालेली सन्मानचिन्ह दिसली. यानंतर चोराला पश्चाताप झाला. आणि चोरलेलं सर्व सामान पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला.
चोराने मागितली माफी...
चोराने एक चिठ्ठी लिहिली आणि भिंतीवर चिकटवली. चिठ्ठीत त्याने लिहिलं की, हे नारायण सुर्वेंचं घर असल्याचं मला माहीत नव्हतं, अन्यथा मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी तुमची जी वस्तू घेतलीय, ती परत करतोय. मी टीव्हीपण नेला होता, परंतू आणून ठेवला, सॉरी.