मराठी बोलणार नाही. मला मराठी येत नाही. हिंदीमध्येच बोलणार या सारख्या घटना मुंबईत अनेक ठिकाणी झाल्याच्या समोर आला. अशा मराठी भाषेच्या द्वेष्ट्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने धडा शिकवला. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता मराठी विरुद्ध गुजराती हा वाद समोर आला आहे. घाटकोपरमध्ये मराठी कुटुंब मांसाहार करतं म्हणून त्यांना अपमानीत करण्यात आलं. ही बाब मनसैनिकांना समजताच त्यांनी त्या सोसायटीमध्ये धडक देत, मराठीचा तिरस्कार करणाऱ्यांचा माज उतरवला. याचाही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घाटकोपरमध्ये एका सोसायटीत बहुतांश गुजराती, मारवाडी आणि जैन लोक राहातात. त्यात काही मराठी कुटुंबही आहेत. या सोसायटीत शाह नावाचं व्यक्ती राहातो. त्याने 'मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटन खाते हो', असे म्हणत मराठी कुटुंबाचा अपमान केला. या रहिवासी सोसायटीत 4 मराठी कुटुंब आहेत. गेल्या काही दिवसांपासून मांसाहार करण्यावरुन अमराठी रहिवासी मराठी कुटुंबांना त्रास देत होते. याची माहिती मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांना मिळाली.
त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्या इमारतीत दाखल झाले होते. त्यांनी शाह नावाच्या व्यक्तीने मराठी कुटुंबाच्या केलेल्या अपमानाचा जाब विचारला. त्या शाहला खाली बोलवा. त्याल धडा शिकवतो असं मनसैनिक सांगत होते. पण मनसैनिकांच्या भितीने शाह काही खाली आलाच नाही. सोसायटीचे इतर रहिवाशी मात्र खाली आले. त्यांनी आम्ही मराठी गुजराती असा भेद करत नाही. शिवाय कुणाच्या खाण्यावर ही आम्ही बंधने टाकली नाहीत अशी सोसायटी सदस्यांनी सारवासारव केली. यावेळी सोसायटीच्या सदस्यांना मनसैनिकांनी दम देत समज दिली.
याबाबत आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. मांसाहाराबाबत आम्ही एसंशि पक्षाचे नेते अमित शाह यांच्याकडे तक्रार करू. संघाचे भैय्याजी जोशी यांनी घाटकोपरला जाऊन घाटकोपर गुजरात्याचं सांगितलं होतं. त्यामुळे हे काय सुरू आहे. कसं सुरू आहे. त्यांना कसा इंगा दाखवायचा. पण आम्ही नक्कीच अमित शाह, नरेंद्र मोदी यांना हे कळवू. कारण त्यांना मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे. त्याला भाजपसह इतर पक्षांचं मूक समर्थन आहे, असे संजय राऊत या निमित्ताने म्हणाले.
दरम्यान मी स्वतः मराठी आहे. मी पाच वर्षापासून या सोसायटीत राहतो. कधीच मराठी अमराठी वाद झालेला नाही. मला कधीच मांसाहार करण्यापासून रोखलं नाही. सोसायटीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चुकीचे आरोप केले जात आहेत, असं सोसायटीचे अध्यक्ष सतीश गोरे यांनी सांगितलं. तर आम्ही एखाद्याला मांसाहार करण्यापासून रोखलं याचा पुरावा असेल तर आम्हाला वाटेल ती शिक्षा द्या. आम्ही ग्रुप वर अशा प्रकारचा कुठलाही संदेश टाकला नाही. सोसायटीने मासाहार संदर्भात कुठलाही पोल घेतला नाही. सोसायटीत झालेल्या वाद विवादाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय. जर आम्हाला मराठी अमराठी वाद करायचा असता तर आम्ही आमच्या सोसायटीचा अध्यक्ष हा मराठी होऊ दिला नसता, असं कोषाध्यक्ष हिरेन भावसार यांनी स्पष्ट केलं आहे.