सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर
पैशांसाठी सासरकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातील नांदर गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राधा संतोष शेळके असं मृत महिलेचं नाव असून ती सुंदरवाडी झाल्टा येथील रहिवासी होती. राधाचा विवाह काही वर्षांपूर्वी संतोष शेळके यांच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सुरुवातीला सासरकडून चांगले वागवले गेले, मात्र नंतर घर बांधण्यासाठी वडिलांकडून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने पैसे देणे शक्य नसल्याचे राधाने सांगितले.
(नक्की वाचा- Pune News: दिवाळीदरम्यान 'या' फटाक्यांवर पूर्णपणे बंदी; पुणे पोलिसांकडून निर्देश जारी)
त्यानंतर सासू कमलबाई शेळके, दीर राजेंद्र शेळके, जाऊ निकिता राजेंद्र शेळके आणि ननंद जनाबाई अमोल राठोड यांनी तिचा सतत छळ सुरू केला. सततच्या त्रासाला कंटाळून राधाने अखेर टोकाचा निर्णय घेत शेतातील तलावात उडी घेतली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात मोठा जमाव केला. आरोपींना अटक न झाल्यास शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर शवविच्छेदन पार पडले. परिस्थिती पाहता पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.