भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा ते दापोडा रस्त्यावरील वळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत असलेल्या एका भंगार गोदामाला रात्री एक वाजताच्या सुमारास आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता भंगार गोदाम जळून खाक झाले. हळूहळू ही आग रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांपर्यंत पोहचली आणि त्यात एक कंटेनर, एक छोटा टेम्पो व दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमक दलाचे एक फायर फायटर वाहन घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल तीन तासाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
गोदाम पट्ट्यातील भंगार साठवणूक केलेलं ज्वालाग्राही साहित्य आगीचे कारण असल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गोदामाला अचानक आग लागली. या भीषण आगाती 8 दुकानांसह अनेक वाहने जळून खाक झाले आहेत.
विशेष म्हणजे आगीच्या बाजूलाच एक पेट्रोल पंप होते आणि या पेट्रोल पंपावर पेट्रोल ने भरलेले दोन टँकर देखील उभे होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीच्या घटनेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाण्याची कमतरता भासत होती, त्यामुळे काही काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी जाणवत होत्या.