दत्तात्रय भालेघेरे उर्फ दत्ता पवार हे सध्या चांगलचं गाजत आहे. हे नाव आहे एका माथाडी कामगाराचं. पण त्याचं नाव माथाडी कामगार म्हणून नाही तर कमी वेळात कोट्यवधींची माया जमवल्यामुळे चर्चेत आहे. त्याच्याकडे आलिशान बंगलाच नाही, तर 10 ते 15 कोटी रुपयांच्या आलिशान गाड्याही आहेत. शिवाय मुंबईत तब्बल 200 ते 300 कोटींची जमीनही आहे. आता एवढी माया एका माथाडी कामगाराने कमावली कशी असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. सध्या विधीमंडळाचे अधिवेश सुरु आहे. या अधिवेशनात हाच प्रश्न आमदारांनाही पडला. शिवाय त्यांनी याच पवारचा काळाचिठ्ठा सभागृहा पुढे मांडला.
काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी दत्ता पवार याचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. दत्ता पवार नावाचा जो माणूस आहे त्याने आणि दिनेश दाभाडे नावाच्या अधिकाऱ्याने 400 कोटींचे गौडबंगाल केलं आहे असा आरोप जगताप यांनी केला. एक गुंड तुमच्याने नेस्तनाबूत होत नसेल आणि त्याला वाचवण्यासाठी कायद्याला नख लावायला निघाला आहात का? असा प्रश्न यावेळी जगताप यांनी केला. दत्ता पवार हा राजरोसपणे मंत्र्यांच्या दालनात फिरतो. त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो. तो वाँटेड आहे. तो मर्सिडीजमधून फिरतो तो ही बाबत जगताप यांनी निदर्शनास आणून दिली.
या दत्ता पवारच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सरकारने एसआयटी स्थापन केली. पण हा हरामखोर त्यानंतर ही बिनधास्तपणे फिरतोय असं भाई जगताप म्हणाले. तो सर्रास मंत्र्यांच्या बंगल्यांवर जातो. त्यांच्या कार्यालयात फिरतोय. दत्ता पवार जो गुंड आहे, डॉन आहे. त्याच्याकडून कामगारमंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला असा आरोपही या निमित्ताने जगताप यांनी केला. मात्र कामगारमंत्र्यांनी या गोष्टीला भीक घातली नाही. त्यांनी एसआयटीची निर्मिती केली असं ही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की दत्ता पवार कोणाचा जावई लागतो का ? हा नामचीन गुंड आहे. त्याने केलेले अपराध रेकॉर्डवर आहेच. एसआयटीने त्याला दोषी धरलं आहे. एफआयआर दाखल झाला आहे. दत्ता पवारवर कारवाई झालीच पाहीजे. त्यामुळे आता पोलिसांना आदेश द्या, जसे गँगवॉर निपटवून टाकले, तसे घाला ना गोळ्या या गुंडाला. हा गुंड सरकारला गृहीत धरत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचे कारण काय? असा खडा सवाल त्यांनी विधान परिषदेत केला.
नक्की वाचा - MNS Protest: "मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली?" CM फडणवीस यांचा पोलिसांवर संताप
याला उत्तर देताना मंत्री आकाश फुंडकर यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. बोगस माथाडी कामगारांबद्दल चर्चा सुरू आहे. बोगस माथाडी कामगारांबद्दल सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही अशी विचारणा झाली. हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मी एसआयटी लावली असे फुंडकर यांनी यावेळी सांगितले. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आम्ही कोणालाही न भीता, तो कोणीही असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही. कोणी कितीही मोठा असला, कितीही मोठा गुंड असला तरी त्यावर कारवाई करू असे आश्वासन यावेळी फुंडकर यांनी विधान परिषदेत दिले.