भारतातील एकमेव मेबॅक कार कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात; जाणून घ्या कारची खासियत

Kolhapur Maybach Car : 200 लिटर क्षमतेचा पेट्रोल टँक असणारी ही गाडी 1 लीटर पेट्रोलमध्ये फक्त 1 किलोमीटर धावते.

जाहिरात
Read Time: 3 mins
कोल्हापूर:

कर्नाटकातील म्हैसूरच्या धरतीवर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात शाही दसरा सोहळा (Kolhapur Dasara Sohala) साजरा करायला सुरुवात केली. सध्या भारतामध्ये दोन नंबरचा महत्त्वाचा असा हा सोहळा असतो. तर याच सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापूरकरांना भारतात सध्या एकमेव असलेली कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची (Kolhapur Chhatrapati family) शाही मेबॅक कार पाहता येते. गेली कित्येक वर्ष ही कार कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याची शान बनली आहे.

कोल्हापुरातील छत्रपतींच्या मालकीची मेबॅक कार लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. कोल्हापुरात शारदीय नवरात्रौत्सवानंतर विजयादशमीला साजरा होणाऱ्या सीमोल्लंघनासाठी छत्रपती घराण्यातील सदस्यांचे या मेबॅक कारमधूनच ऐतिहासिक दसरा चौकात आगमन होत असते. या एकाच दिवशी कोल्हापूरकरांना ही कार पाहायला मिळत असते.

असा आहे या कारचा इतिहास 
मेबॅक कार ही जर्मननिर्मिती गाडी आहे. तर छत्रपतींच्या मालकीची ही मेबॅक कार ऑर्डर देऊन तयार करून घेण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कंपनीकडून या कारचे उत्पादन ठप्प झाल्यामुळे जगभरात अगदी मोजक्याच कार सध्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यातील एक ही कोल्हापुरातील शाही मेबॅक कार आहे. तर जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर देखील अशीच मेबॅक कार वापरत होता. त्यामुळे या गाडीला 'हिटलरर्स रोल्स' असेही म्हटले जात असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे.

शाहू महाराजांच्या काळात दसरा सोहळ्यासाठी हुजुर स्वारी ही हत्ती, घोडे, उंट अशा सर्व शाही लवाजम्यासह रथातूनच यायची. मात्र छत्रपती राजाराम महाराज यांनी ही मेबॅक कार साधारण 1936 च्या सुमारास बनवून घेतली होती. त्यांच्या काळापासूनच या कारनेच रथाची जागा घेतली आहे. त्यामुळे दरवर्षी पार पडणाऱ्या  कोल्हापुरच्या शाही दसरा सोहळ्यात ही मेबॅक कार आजही प्रमुख आकर्षण असते.

नक्की वाचा - 'मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं'; दसरा मेळाव्याला भगवान गडावरून पंकजा मुंडेंचं तडफदार भाषण

अशी आहे ऐतिहासिक मेबॅक कार...
छत्रपती राजाराम महाराज यांनी ही कार ऑर्डर देऊन बनवून घेतली होती. त्यामुळे या गाडीला कोल्हापूर अर्थात करवीर संस्थानच्या ध्वजाचा केशरी रंग देण्यात आला आहे. गाडी बनवताना चढवलेला रंगच आजही गाडीवर आहे. गाडीवर पुढच्या बाजूला करवीर संस्थानचे मानचिन्ह देखील दिसते. त्याच्या बाजूने 'छत्रपती महाराज ऑफ कोल्हापूर' असेही लिहिण्यात आले आहे. तर त्याच्याच वरच्या बाजूला शिवछत्रपतींना तलवार देणारी भवानीमाता कोरण्यात आली आहे. गाडीच्या बॉनेटवर भगवा ध्वजही लावण्यात आला आहे.

खरंतर कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात ध्वजाबाबत एक परंपरा जपली जाते. जेव्हा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती वाड्यात उपस्थित असतात. तेव्हाच वाड्यावर भगवा ध्वज फडकत असतो. अगदी तशीच परंपरा या गाडीसाठी वापरली जाते. जेव्हा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती गाडीत असतात, तेव्हाच समोरचा भगवा ध्वज उघडला जातो.

नक्की वाचा - RSS Vijayadashami : कोणाचीही गुंडगिरी चालू देऊ नका ! सरसंघचालकांच्या भाषणातील 15 ठळक मुद्दे

गाडी 17 फूट लांब आणि 6 फूट रुंद असून गाडीत 6 ते 7 जण आरामात बसू शकतात. तर ही गाडी पूर्णतः ऑटोमॅटिक असून गाडीचे स्पीडमीटर किलोमीटर ऐवजी मैल परिमाण दाखवते. गाडीला मेकॅनिकल ब्रेक असून त्याला वॅक्युम असिस्टंस आहे. गाडीचे छत हवे तसे उघडता किंवा बंद करता येत असून गाडीला टिंटेड फोल्डेबल काचा आहेत. 200 लिटर क्षमतेचा पेट्रोल टँक असणारी ही गाडी 1 लीटर पेट्रोलमध्ये फक्त 1 किलोमीटर धावते. अगदी छोट्या छोट्या बाबतीत देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणारी ही गाडी अतिशय रॉयल वाटते. तर दरवेळी शाही दसरा सोहळ्यात सर्वांसमोर छत्रपतींना घेऊन तिची शाही एन्ट्री होत असते. त्यामुळे कोल्हापूरकर नेहमीच या गाडीला पाहण्यासाठी उत्सुक असतात.