म्हाडाच्या (MHADA) घरांच्या किमती कमी झाल्याने अनेकांशा आशा पल्लवित झाल्या असून सर्वांचं लक्ष म्हाडाच्या घराच्या सोडतीकडे लागले आहे. म्हाडाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीसाठी 19 सप्टेंबरला अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी या घरांची लॉटरी पार पडणार आहे. दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लॉटरी काढली जाणार आहे.
घरांच्या किमती झाल्या कमी...
यंदाच्या लॉटरीमधील घरे ही खूप महाग असल्याची टीका करण्यात येत होती. म्हाडाने या टीकेची दखल घेत म्हाडाच्या काही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला. खासगी विकासकांनी बांधलेली आणि म्हाडाला हस्तांतरीत केलेल्या घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. खासगी विकासकांनी बांधल्यामुळे या घरांच्या किंमती जास्त होत्या. एकूण 2030 घरांपैकी 370 घरांच्या किंमती कमी करण्यात आलेल्या आहेत. 33/5 आणि 33/7 अंतर्गत म्हाडाला प्राप्त झालेल्या घरांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या काही निवडक घरांमधील EWS घरांची किंमत 25 % ने , LIG घरांची किंमत 20 % तर MIG घरांची किंमत 15% याशिवाय HIG घरांची किंमत 10 % ने कमी केल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - 'पोर्ट ब्लेयर'चं नाव बदललं, सावरकर आणि नेताजींचा उल्लेख करत सरकारनं केली घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी मिळालेल्या अर्जांची प्रारुप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी 6.00 वाजता प्रसिद्ध होईल.
यानंतर 29 सप्टेंबरला दुपारी 12 पर्यंत प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे, हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
3 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता लॉटरीसाठी स्वीकृत अर्जाची शेवटची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होईल. यानंतर सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावं म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील.