म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2147 सदनिका व 110 भूखंड विक्रीकरिता 05 फेब्रुवारी 2025 ला संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत दुपारी 1.00 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहाणार आहेत. ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात या संगणकीय सोडतीचे आयोजिन करण्यात आलं आहे. अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
कोकण मंडळाच्या 2147 सदनिका व 110 भूखंडासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी जवळपास 24,911 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, रायगड, सिंधुदुर्गमधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या सदनिका व भूखंड विक्रीच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 11 ऑक्टोबर 2024 रोजी सुरूवात झाली होती.
मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदारांना 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. 07 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 पर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन व संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत होती. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 .00 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता सोडतीत सहभाग घेणाऱ्या अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीच्या दिवशी अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच सोडत ऍपवर प्राप्त होणार आहे.