MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) एक सुवर्णसंधी आणली आहे. मुंबईतील विविध वसाहतींमधील रिकाम्या असलेल्या 118 सदनिकांची विक्री 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केली जाणार आहे.
या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी उद्या, 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. यापूर्वी काही तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती, मात्र आता ती नव्याने राबवण्यात येत आहे.
ऑनलाइन अर्ज आणि सदनिका निश्चितीचे वेळापत्रक
इच्छुक अर्जदारांना म्हाडाच्या [https://bookmyhome.mhada.gov.in](https://bookmyhome.mhada.gov.in) या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. अर्ज नोंदणी उद्यापासून सुरू होत असली, तरी ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे आणि आपली हवी ती सदनिका निश्चित करणे या प्रक्रियेला 04 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून सुरुवात होईल.
विशेष म्हणजे, अर्जदाराने सदनिका निश्चित केल्यानंतर 48 तासांच्या आत सदनिकेच्या एकूण विक्री किमतीच्या 10 टक्के रकमेचा भरणा करणे अनिवार्य आहे.
( नक्की वाचा : Navi Mumbai News: नवी मुंबई विमानतळ परिसरात घर शोधताय? 'हेवी डिपॉझिट'ची ही बातमी वाचल्याशिवाय व्यवहार करू नका! )
कोणत्या भागात किती सदनिका उपलब्ध?
या योजनेअंतर्गत मुंबईच्या विविध भागांत सदनिका उपलब्ध आहेत. यामध्ये म्हाडाने स्वतः बांधलेल्या 82 सदनिकांचा समावेश आहे, ज्यामध्ये शिंपोली कांदिवली येथे 08, चारकोप सेक्टर-8 मध्ये 01, अँटॉप हिल-वडाळा येथे 27, तुंगा पवई येथे 42, मानखुर्द येथे 01 आणि मालवणी-मालाड भागात 02 सदनिका उपलब्ध आहेत.
तसेच विकास नियंत्रण नियमावलीच्या अंतर्गत म्हाडाला प्राप्त झालेल्या 36 सदनिकाही विक्रीसाठी आहेत. यात घाटकोपर पूर्व 02, विक्रोळी 01, वडाळा 08, भायखळा 06, ताडदेव 06, लोअर परळ 04, सायन 02 आणि अंधेरी पश्चिम जेव्हीपीडी येथे 07 सदनिकांचा समावेश आहे.
( नक्की वाचा : Pune News: चेक विसरा, आता थेट बँक खात्यात पडणार करोडो रुपये; पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! वाचा अपडेट )
अर्जासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक असून तो भारतीय नागरिक असावा. अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा किमान 15 वर्षे वास्तव्याचा अधिवास दाखला (डोमिसाइल सर्टिफिकेट) असणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र जानेवारी 2018 नंतरचे आणि बारकोडसह असावे.
अर्जासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक आणि पती-पत्नी दोघांचे ईमेल आयडी आवश्यक आहेत.अर्जदार विवाहित असेल तर जोडीदाराची कागदपत्रेही लागतील. आरक्षित प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
सदनिका मिळवण्याची पद्धत आणि अटी
अनामत रक्कम भरल्यानंतर अर्जदाराला 'बुक माय होम' या बटणाद्वारे इमारतीचा क्रमांक आणि सदनिकेची माहिती दिसेल. जर सदनिका उपलब्ध असेल, तर अर्जदार ती निवडू शकतात. एकदा सदनिका निश्चित झाली की, 48 तासांत 10 टक्के रक्कम भरावी लागेल.
ही रक्कम वेळेत भरली नाही, तर सदनिकेवरील दावा रद्द होईल आणि भरलेली अनामत रक्कम जप्त केली जाईल. उर्वरित रक्कम भरण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली जाईल. काही विशेष परिस्थितीत व्याजासह आणखी 90 दिवसांची मुदतवाढ मिळू शकते.
म्हाडाने स्पष्ट केले आहे की, या सदनिकांच्या विक्रीसाठी कोणत्याही एजंट किंवा सल्लागाराची नियुक्ती केलेली नाही. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी पैशांचे व्यवहार करू नयेत. फसवणूक टाळण्यासाठी म्हाडाने हेल्पलाईन क्रमांक 9869988000 जारी केला आहे. तसेच तक्रारीसाठी 022-66405448 किंवा 022-66405123 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. अर्ज करण्यापूर्वी नागरिकांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन मुंबई मंडळाने केले आहे.