Navi Mumbai Real Estate Scam: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सध्या या परिसरातील घरांच्या किंमती आणि मागणी गगनाला भिडली आहे. पण घराच्या याच शोधात असलेल्या सर्वसामान्यांची 'हेवी डिपॉझिट'च्या नावाखाली मोठी आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले आहे. कामोठे परिसरात अशाच एका फसवणुकीच्या प्रकारानंतर गुन्हा दाखल झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील वाढत्या शहरीकरणाचा फायदा घेण्यासाठी सक्रिय झालेल्या बनावट दलालांपासून सावधान राहण्याची वेळ आता आली आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजकिरण प्रतापसिंह चव्हाण (वय 68), रोहिणी राजकिरण चव्हाण (वय 58) आणि निखील राजकिरण चव्हाण (वय 30, सर्व राहणार निलकंठ दर्शन, पनवेल) या एकाच कुटुंबातील तिघांनी एजंट राजकुमार जाधव याच्या माध्यमातून एका व्यक्तीची फसवणूक केली. पनवेल येथील एक रूम 8 लाख रुपये हेवी डिपॉझिटवर देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते.
ही फसवणूक अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्टर एग्रीमेंट आणि नोटराइज एग्रीमेंट देखील तयार करून दिले. इतकेच नाही तर त्यासोबत सोसायटीची बनावट एनओसी (नाहरकत प्रमाणपत्र) जोडून त्यांचा विश्वास संपादन केला.
10 एप्रिल 2024 रोजी कामोठे येथील एका वकिलाच्या कार्यालयात हा व्यवहार पार पडला. मात्र, 8 लाख रुपये स्वीकारल्यानंतरही आजपर्यंत संबंधित रूमचा ताबा देण्यात आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने पोलिसात धाव घेतली आणि 9 फेब्रुवारी 2026 रोजी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
( नक्की वाचा : Navi Mumbai News: फर्जी कॉल सेंटरला खाकीचे 'प्रोटेक्शन'; नवी मुंबई कनेक्शनने बड्या IPS अधिकाऱ्यांची झोप उडाली )
सोशल मीडियावरील जाहिरातींपासून सावध रहा
सध्या सोशल मीडिया आणि काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये "10 ते 15 लाख रुपये डिपॉझिट द्या आणि मासिक भाडे न भरता राहा" अशा आकर्षक जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे.
उलवे, बेलापूर, पनवेल आणि कामोठे या भागांमध्ये घरांची मागणी मोठी असल्याने भूमाफिया आणि बनावट दलाल याच संधीचा फायदा घेत आहेत. अनेकदा एकाच फ्लॅटसाठी अनेकांकडून पैसे उकळले जातात आणि प्रत्यक्ष ताबा कोणालाच दिला जात नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद मसलकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
( नक्की वाचा : Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनादिवशीच मंत्रालयात गैरप्रकार? अल्पसंख्याक विभागातील 'तो' धक्कादायक प्रकार उघड )
व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी?
नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही मोठ्या रक्कमेचा व्यवहार करताना डोळे झाकून विश्वास ठेवू नका. 8 ते 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम गुंतवताना केवळ जाहिराती पाहू नका.
व्यवहार करण्यापूर्वी एखाद्या विश्वासार्ह वकिलामार्फत कागदपत्रांची सखोल तपासणी करून घ्यावी. मालकी हक्क, सोसायटीची खरी एनओसी, करारनाम्याची अधिकृत नोंदणी आणि संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासूनच पैसे द्यावेत. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world