महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आज एका भव्य शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार *महेश लांडगे* यांनी अजित पवारांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत अत्यंत भावुक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.
अवघ्या 40 सेकंदांचे भाषण अन् डोळ्यांत पाणी
महेश लांडगे मंचावर आले तेव्हा त्यांचे डोळे पाणावलेले होते. त्यांनी माईक हातात घेतला आणि केवळ 40 सेकंदांचे भाषण केले. या भाषणात त्यांनी कोणताही राजकीय संदर्भ न देता केवळ भावनांना वाट करून दिली. "दादा, मला माफ करा..." असे आर्त उद्गार काढत त्यांनी आपले भाषण संपवले आणि ते तडक मंचावरून खाली उतरले. त्यांच्या या कृतीने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
VIDEO
(नक्की वाचा- "NCP च्या एकत्रिकरणाची इच्छा नाही, तसं अजितदादाही काही बोलले नाहीत", राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य)
निवडणुकांतील संघर्ष आणि जिव्हारी लागलेली टीका
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये 'अजित पवार विरुद्ध महेश लांडगे' असा थेट सामना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. महेश लांडगे यांनी प्रचारादरम्यान अजित पवारांवर केलेल्या काही टीकेचा आणि एकेरी उल्लेखाचा मुद्दा दादांच्या जिव्हारी लागला होता. पिंपरी-चिंचवडच्या सत्तेसाठी झालेल्या या युद्धाने उभय नेत्यांमध्ये मोठी राजकीय दरी निर्माण केली होती.
निधनानंतर संपली राजकीय कटुता
28 जानेवारीच्या त्या दुर्दैवी घटनेने केवळ महाराष्ट्र पोरका झाला नाही, तर अनेकांच्या मनातील द्वेषही संपवून टाकला. महेश लांडगे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरून आणि शोकसभेतील त्यांच्या वागण्यावरून हे स्पष्ट झाले की, अजित दादांच्या जाण्याने त्यांच्या मनातील सर्व राजकीय कटुता आता कायमची संपली आहे. "राजकारण आपल्या जागी असते, पण दादांसारखा माणूस महाराष्ट्राने गमावणे ही मोठी हानी आहे," अशी भावना लांडगे समर्थकांकडून व्यक्त होत आहे.