Dombivli News: कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर मनसेचा 'मराठी' दणका, परप्रांतीय रिक्षाचालकही सहभागी

Dombivli News: कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli News: कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं नवं आंदोलन केलं.
डोंबिवली:

Dombivli News: कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात धावणाऱ्या रिक्षांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर्स लावण्याची विशेष मोहीम मनसेकडून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे स्थानिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रिक्षाचालकांमध्ये याची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

मराठी सक्तीच्या विरोधाला मनसेचे उत्तर

येत्या 4 मे रोजी मराठी भाषेच्या सक्तीविरोधात काही घटकांकडून आंदोलन पुकारण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावित आंदोलनाला मनसेने आपल्या खास शैलीत उत्तर देण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही स्टिकर मोहीम राबवली जात असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मराठी भाषेचा सन्मान राखलाच पाहिजे, असा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.

Advertisement

परप्रांतीय रिक्षाचालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मराठीच नव्हे, तर परप्रांतीय रिक्षाचालकांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनेक अ-मराठी भाषिक चालकांनी स्वेच्छेने आपल्या रिक्षांवर हे स्टिकर्स लावून घेतले आहेत. आपण ज्या राज्यात आणि शहरात राहतो, तिथली भाषा आपल्याला समजलीच पाहिजे आणि आपण ती बोलली पाहिजे, अशी भावना या चालकांनी व्यक्त केली आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये 4 मे रोजी राडा होणार? मराठी सक्तीच्या मुद्यावर मनसेचा आक्रमक इशारा )

मनसेचे पदाधिकारी आरिफ शेख आणि योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी त्यांनी रिक्षाचालकांशी संवाद साधून प्रवाशांशी मराठीतच बोलण्याचे आवाहन केले. शफिउल्लाह या रिक्षाचालकाने देखील यावेळी आपली प्रतिक्रिया देताना मराठी शिकण्याची आणि ग्राहकांशी मराठीत संवाद साधण्याची तयारी दर्शवली.

राजकीय वातावरण तापणार?

डोंबिवलीतील या मोहिमेमुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. स्थानिक रिक्षाचालकांनी या मोहिमेला दिलेला प्रतिसाद पाहता, आगामी काळात मराठी भाषेचा मुद्दा आणखी जोर धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेच्या या पावलामुळे इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Topics mentioned in this article