Mumbai Lakes Water Level: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी महत्त्वाचा असलेला मोडक सागर तलाव आज, 9 जुलै 2025 रोजी सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या तलावाचा एक दरवाजा 1 फूट उघडण्यात आला असून, प्रति सेकंद 1022 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
( नक्की वाचा: मध्य वैतरणा धरणाचे 90 टक्के भरले! 3 दरवाजे उघडले )
मध्य वैतरणा 90 टक्के भरले
गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांची पाणी पातळी वेगाने वाढली आहे. 7 जलाशयांपैकी 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' 7 जुलै 2025 रोजीच सुमारे 90 टक्के भरले होते. या धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
( नक्की वाचा: मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील 239 शाळांना महिनाभर सुट्टी )
आज ओसंडून वाहू लागलेल्या मोडक सागर तलावाची कमाल जलधारण क्षमता 12892.5 कोटी लीटर (128,925 दशलक्ष लीटर) इतकी आहे. गेल्या वर्षी 2024 मध्ये 25 जुलै रोजी, तर 2023 मध्ये 27 जुलै रोजी हा तलाव ओसंडून वाहू लागला होता. यंदा लवकर भरल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
एकूण पाणीसाठा 72.61 टक्के
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (1,447,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज सकाळी 6 वाजताच्या मोजणीनुसार, सर्व 7 तलावांमध्ये मिळून 105091.2 कोटी लीटर (1,050,912 दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण क्षमतेच्या तुलनेत 72.61 टक्के इतका आहे, ज्यामुळे मुंबईची पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.