Mohan Bhagwat Speech: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्तच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत राष्ट्रीय सुरक्षिततेवर तसेच आपले मित्र आणि शत्रू कोण यावर भाष्य केले. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सविस्तर उल्लेख करत म्हटलं की, सीमा पार करून आलेल्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून 26 भारतीय नागरिकांची हत्या केली. या हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात शोक आणि संतापाची लाट पसरली होती. या घटनेनंतर भारत सरकारने एका सुनियोजित योजनेनुसार मे महिन्यात या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले.
मोहन भागवत यांनी पुढे म्हटलं की, "आपण सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले तरी, आपल्याला आपल्या सुरक्षिततेबद्दल नेहमी सजग राहावे लागेल. पहलगाम हल्ला आपल्याला बरंच काही शिकवून गेला. यापुढे आपल्याला सावध आणि सज्ज राहावं लागेल. हल्ल्यानंतर आपले मित्र कोण-कोण आहेत हे देखील कळालं."
स्वदेशी आणि स्वावलंबी बनावं
मोहन भागवत यांनी अमेरिच्या टॅरिफ हल्ल्याचा देखील उल्लेख केला. भागवत यांनी म्हटलं की, अमेरिकेच्या टॅरिफचा सर्वांनाच फटका बसत आहे. त्यामुळे सध्याच्या अर्थ प्रणालीवर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही. निर्भरता मजबुरी न बनवता 'स्वदेशी' आणि 'स्वावलंबी' जीवन जगावे लागेल. जागतिक राजकीय आणि आर्थिक संबंध ठेवणे आवश्यक आहेत, मात्र यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये.