Monsoon 2026: आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आणि कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी मान्सूनची बातमी नेहमीच सुखावह असते. मात्र, यंदा पावसाच्या आगमनासोबतच एक मोठं संकट घोंघावत असल्याची चिन्हे आहेत. हे संकट म्हणजे पॅसिफिक महासागरातून येणारा 'एल निनो'. जगभरातील हवामान तज्ज्ञांनी आता असा इशारा दिला आहे की, हा एल निनो आपण विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी आधी धडकणार आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा फक्त पावसाचाच नाही, तर अनिश्चिततेचाही ठरणार असल्याचं दिसतंय.
पॅसिफिक महासागराचं वाढतं तापमान
अमेरिकेतील नॅशनल ओशन अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) या संस्थेने नुकताच एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मे ते जुलै या काळात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आता 82 टक्के इतकी वाढली आहे. गेल्या महिन्यात हा अंदाज फक्त 61 टक्के होता. याचाच अर्थ असा की, मान्सून ज्या काळात ऐन भरात असतो, त्याच वेळी एल निनो आपलं डोकं वर काढणार आहे.
पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान मे महिन्याच्या सुरुवातीलाच सरासरीपेक्षा 0.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. हे तापमान जर 0.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं, तर एल निनोचा अधिकृत विळखा पडला असं समजलं जाईल.
( नक्की वाचा : Bermuda Triangle: बर्म्युडा ट्रँगलचं सर्वात मोठं गूढ उकललं? समुद्राच्या खाली शास्त्रज्ञांना सापडलं तरी काय? )
काय आहे हा एल निनोचा धोका?
सोप्या भाषेत सांगायचं तर, एल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान असामान्यपणे वाढणे. जेव्हा हे तापमान वाढतं, तेव्हा वाऱ्यांच्या चक्रावर त्याचा परिणाम होतो आणि त्याचा थेट फटका भारतीय मान्सूनला बसतो. गेल्या 45 वर्षांचा इतिहास पाहिला तर 1980 पासून झालेल्या एकूण एल निनोच्या घटनांपैकी 70 टक्के वेळा भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
अनेकदा यामुळे भीषण दुष्काळाची परिस्थितीही ओढवली आहे. युरोपियन एजन्सीने तर असा इशारा दिला आहे की, हा एल निनो मे महिन्यातच सक्रिय होऊ शकतो आणि तो आजवरच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली एल निनो ठरू शकतो.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : परीक्षेआधीच वाटला पेपर; लातूरचा प्राध्यापक PV कुलकर्णीने असा रचला होता पेपरफुटीचा प्लॅन )
हवामान विभागाचा अंदाज आणि चिंता
भारतीय हवामान विभागाचे (IMD) प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनीही या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. एल निनो अपेक्षेपेक्षा लवकर आला, तर मान्सूनच्या पावसावर त्याचा मोठा परिणाम होईल. हवामान विभागाने आधीच यावर्षी सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. 2007 नंतरचा हा सर्वात कमी पावसाचा अंदाज मानला जात आहे.
मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत एल निनोचा प्रभाव राहिल्यास पावसाचे प्रमाण आणखी घटू शकते. हवामान विभाग आता पुढच्या आठवड्यात मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर करणार आहे, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नोव्हेंबरपर्यंत वाढणार संकटाची तीव्रता
एल निनो फक्त लवकरच येणार नाही, तर तो प्रचंड शक्तीशाली होण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात हा एल निनो 'सुपर एल निनो' मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता 37 टक्के आहे. याचा अर्थ पावसाळा संपल्यानंतरही याचे परिणाम हवामानावर जाणवू शकतात. पावसाच्या लहरीपणामुळे शेतीचं गणित बिघडण्याची शक्यता असून, पाण्याचे नियोजन करणे आतापासूनच महत्त्वाचे ठरणार आहे.