जाहिरात

Bermuda Triangle: बर्म्युडा ट्रँगलचं सर्वात मोठं गूढ उकललं? समुद्राच्या खाली शास्त्रज्ञांना सापडलं तरी काय?

Bermuda Triangle mystery solved : जहाजे आणि विमाने गायब होण्याच्या घटनांमुळे जगभरात भीती आणि उत्सुकतेचा विषय बनलेल्या या भागातील एका मोठ्या गुढाचा अखेर पडदा उठला आहे.

Bermuda Triangle: बर्म्युडा ट्रँगलचं सर्वात मोठं गूढ उकललं? समुद्राच्या खाली शास्त्रज्ञांना सापडलं तरी काय?
Bermuda Triangle :बर्म्युडा बेटाच्या अगदी खाली पृथ्वीवर इतर कुठेही न आढळणारी एक विशेष भूगर्भीय रचना आहे.
मुंबई:

Bermuda Triangle mystery solved : जगातील सर्वात मोठे रहस्य आणि अनेक चित्रविचित्र कथांमुळे वर्षानुवर्षे चर्चेत राहिलेला अटलांटिक महासागरातील 'बर्म्युडा ट्रँगल' परिसर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. जहाजे आणि विमाने गायब होण्याच्या घटनांमुळे जगभरात भीती आणि उत्सुकतेचा विषय बनलेल्या या भागातील एका मोठ्या गुढाचा अखेर पडदा उठला आहे.

गेल्या 30 दशलक्ष वर्षांहून अधिक काळ शांत असलेल्या या ज्वालामुखीच्या बेटांखाली असे काय लपले आहे, ज्यामुळे बर्म्युडाचा भाग महासागराच्या तळापासून इतका वर उंचावलेला आहे? या प्रश्नाने शास्त्रज्ञांना अनेक दशके चक्रावून सोडले होते. आता अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी जमिनीच्या आत मैलोन्मैल खोलवर जाऊन या रहस्याचा छडा लावला असून, तिथे एक अत्यंत दुर्मिळ रचना शोधून काढली आहे.

बर्म्युडा बेटाखाली नेमकं काय सापडलं?

कार्नेगी सायन्सचे भूकंपशास्त्रज्ञ विल्यम फ्रेझर आणि येल युनिव्हर्सिटीचे जेफ्री पार्क यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. बर्म्युडा बेटाच्या अगदी खाली पृथ्वीवर इतर कुठेही न आढळणारी एक विशेष भूगर्भीय रचना अस्तित्वात असल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. 

सामान्यतः हवाई बेटांसारखी ज्वालामुखी बेटे जमिनीच्या आतून येणाऱ्या उष्ण खडकांच्या प्रवाहामुळे तयार होतात आणि ज्वालामुखी शांत झाल्यावर ती समुद्राच्या तळाशी पुन्हा खचतात. मात्र, बर्म्युडाच्या बाबतीत असे घडले नाही. बर्म्युडा आजही आजूबाजूच्या समुद्राच्या तळापेक्षा तब्बल 1,600 फूट उंच पातळीवर स्थिर आहे.

( नक्की वाचा : Bhojshala Complex: भोजशाला परिसर हे मंदिरच आहे... इंदूर उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ! वाचा सविस्तर )

कसं उघड झालं पृथ्वीच्या पोटातील गूढ

या रहस्याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी जगभरात येणाऱ्या मोठ्या भूकंपांच्या लहरींचा (Seismic Waves) अभ्यास केला. या लहरी पृथ्वीच्या आतून प्रवास करताना वेगवेगळ्या घनतेच्या खडकांमधून जाताना त्यांचा वेग बदलतो. बर्म्युडा येथील सिस्मिक स्टेशनवरील डेटाचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी बेटाच्या खाली सुमारे 20 मैल खोलवर काय परिस्थिती आहे, याचे एक स्पष्ट चित्र तयार केले. 

या तपासणीत शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या कवचाच्या अगदी खाली तब्बल 12 मैल जाडीचा एक प्रचंड मोठा खडकाचा थर आढळला. हा खडक आजूबाजूच्या इतर भागापेक्षा वजनाने खूप हलका आहे. हा हलका खडक एखाद्या तरंगणाऱ्या तराफ्यासारखा काम करतो, जो बर्म्युडा बेटाला महासागराच्या वर तरंगत ठेवण्यास मदत करत आहे.

( नक्की वाचा : JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त )

सुपरकॉन्टिनेंट पँजिया काळाशी जोडले गेले धागेदोरे

शास्त्रज्ञांच्या मते, हा हलका थर कोट्यवधी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर सर्व खंड मिळून एकच महाखंड म्हणजेच 'पँजिया' (Pangea) अस्तित्वात होता, त्या काळातील असू शकतो. कोट्यवधी वर्षांपूर्वी कार्बनने समृद्ध असलेले वितळलेले खडक पृथ्वीच्या आतून वर आले आणि तिथेच थंड होऊन जमा झाले. या संशोधनाचे प्रमुख विल्यम फ्रेझर यांनी सांगितले की, बर्म्युडा हा अभ्यासासाठी अत्यंत रोमांचक भाग आहे. कारण येथील भूगर्भीय रचना पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींचे जुने नियम मोडीत काढते. इथे सापडलेला खडकाचा जाड थर हा जगात इतर कुठेही पाहायला मिळालेला नाही.

जगातील इतर बेटांचाही आता होणार अभ्यास

भूगर्भशास्त्रातील या अत्यंत महत्त्वाच्या शोधाचे सविस्तर वृत्त 'जर्नल जिओफिजिकल रिसर्च लेटर्स' या प्रसिद्ध विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे. बर्म्युडा बेटाखाली सापडलेली ही अनोखी रचना संपूर्ण जगात एकमेव आहे की इतरही काही बेटांखाली अशीच रहस्ये लपलेली आहेत, याचा शोध आता विल्यम फ्रेझर आणि त्यांची टीम जगभरातील इतर बेटांचा अभ्यास करून घेणार आहे. या शोधामुळे पृथ्वीच्या पोटातील अनेक न समजलेल्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com