महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. जवळपास 12 दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून, त्यात आता हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली आहे. कोकण, मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील काही दिवसात पावसाची काय स्थिती असेल हे ही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोकणात मान्सूनचा जोर वाढला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) कोकण आणि गोव्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ज्यामुळे पुढील 24 ते 48 तासांत मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि ठाण्यातही पाऊस होणार आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाळी वातावरण असेल. काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे 30 ते 40 किमी/तास अपेक्षित आहेत.मे महिन्यात मुंबईत सतत पाऊस पडत असून, यापूर्वी 1961 मध्ये अशी परिस्थिती नोंदवली गेली होती.
पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या 9 दिवसांत पुण्यात 160 मिमी पाऊस पडला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे पुढील 48 तासांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी गारांसह विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात पुढील 3-4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि घाट परिसरात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. कोकण, पुणे आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत, तर विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट आहे.