Rain Alert : मे महिन्याच्या अखेरिस धुडघूस घालणाऱ्या पावसाने दडी मारली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचा रिपरिप थांबली आहे. यामुळे शेतीची कामे देखील खोळंबली आहे. मात्र भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 29 मे 2025 पासून थांबलेला मॉन्सून 12 ते 18 जून दरम्यान पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बंगालच्या उपसागरात 12-13 जूनच्या सुमारास पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे महाराष्ट्र, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत मॉन्सूनच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज दिलासादायक आहे.
(नक्की वाचा- Explainer: चिनाब रेल्वे पूलाचं स्वप्न अखेर पूर्ण! चीन-पाकिस्तानचं का वाढलं टेन्शन? वाचा संपूर्ण माहिती)
स्कायमेटचा अंदाज काय?
खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदर सर्व्हिसेसने बंगालच्या उपसागरात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. स्कायमेटचे अध्यक्ष जी. पी. शर्मा म्हणाले, "10 जूनपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळीय स्थिती विकसित होईल, जे 48 तासांत बळकट होईल. यामुळे 11 जूनपासून आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव दिसेल. स्कायमेटने मॉन्सून पुनरुज्जनाचा कालावधी 12 ते 17 जून असा अंदाज वर्तवला आहे.