राज्यातून मान्सूनचा (Monsoon) परतीचा प्रवास लांबला असून, भारतीय हवामान खात्याने (IMD) येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्याचा निरोप घेण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (Low-Pressure Belt) महाराष्ट्रातील हवामान बदलाचे संकेत मिळाले आहेत. येत्या 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान आणि पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्याबाबत बोलायचे झाल्यास यंदाचा विकएंड पुणेकरांसाठी चिंता वाढवणारा ठरू शकतो कारण 27 आणि 28 सप्टेंबर रोजी पुण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन दिवसांत पुण्याला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.
26 सप्टेंबर रोजी दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात, विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र हलक्या सरी कोसळतील.
नक्की वाचा: IMD Rain Update: राज्यात 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस
मराठवाड्यातही पावसाची शक्यता
27 सप्टेंबर रोजी पावसाचे प्रमाण आणि क्षेत्र लक्षणीय वाढेल. दक्षिण मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यवतमाळच्या काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. सोलापूरसह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
कोकणात पावसाचा जोर वाढणार
28 सप्टेंबर रोजी पावसाचा सर्वाधिक जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात राहणार आहे. या दिवशी अहमदनगर (Ahilyanagar), पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर (Mumbai City), ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार सरींची नोंद होऊ शकते. पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
नक्की वाचा: पावसाने मार्ग बदलला? मराठवाड्यानंतर 'या' तीन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन
कृषी विभागाने (Agriculture Department) शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनी 5 ऑक्टोबरपर्यंत सतर्क राहण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने (State Disaster Management Department) केले आहे.