8 डोंगराळ बोगदे, 6.5 किमी लांबी; 5 महिन्यात मोठी कमाल, पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या बोगद्यांचं जाळं

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : गेल्या ५ महिन्यात महाराष्ट्रात पूर्ण झालेला हा तिसरा बोगदा असून यामुळे प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामात एक मोठी यशोगाथा समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हा बोगदा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आंबेसरी गावात तयार करण्यात आला आहे. गेल्या ५ महिन्यात महाराष्ट्रात पूर्ण झालेला हा तिसरा बोगदा असून यामुळे प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार आहे.

काय आहेत बोगद्याची वैशिष्ट्ये...
 

लांबी आणि रुंदी - या नवीन बोगद्याची लांबी ४१७ मीटर आणि रुंदी १४.४ मीटर आहे.
डिझाईन - हा बोगदा बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या दोन्ही दिशांनी ये-जा करणाऱ्या ट्रेन्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे.
स्थान - वापी आणि बोईसर बुलेट ट्रेन स्टेशन दरम्यानचे हे काम असून या भागात बनणाऱ्या तिन्ही डोंगराळ बोगद्यांचे (MT-08, MT-07 आणि MT-06) काम आता पूर्ण झाले आहे.

Advertisement

नक्की वाचा -रेल्वेला बसला 10 पट दंडाचा दणका; कन्फर्म तिकीट असूनही सीट न मिळाल्यानं प्रवाशांना मिळणार मोठी रक्कम

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, या बोगद्याचे खोदकाम दोन्ही बाजूंनी नियंत्रित ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले आहे. बोगद्याची मजबूती आणि आजूबाजूच्या परिसरावर होणारा परिणाम तपासण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला.

रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम, सरफेस सेटलमेंट पॉईंट्स, ३D टार्गेट्स, स्ट्रेन गेज आणि सिस्मोग्राफ यांसारख्या अत्याधुनिक साधनांद्वारे परिसरातील कंपन आणि जमिनीच्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवले गेले. बोगद्याच्या आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य व्हेंटिलेशन सिस्टीम आणि अग्निशामक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.

एकूण ८ डोंगराळ बोगदे होणार तयार...


या संपूर्ण ५०८ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण आठ डोंगराळ बोगदे तयार केले जाणार आहेत. यापैकी सात बोगदे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात, तर एक गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात असणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या नियोजनानुसार, पुढील वर्षाच्या १५ ऑगस्टपर्यंत बुलेट ट्रेन सुरू करण्याची तयारी आहे आणि सुरुवातीला ही ट्रेन गुजरातच्या भागात धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी थोडक्यात...

वेग - ३२० ते ३५० किलोमीटर प्रति तास.
रूट - मुंबई (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स - BKC) ते साबरमती (अहमदाबाद).
स्टेशन्स - एकूण १२ स्टेशन्स (८ गुजरातमध्ये आणि ४ महाराष्ट्रात)
वेळेची बचत - सध्या मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी ६ ते ७ तास लागतात, मात्र बुलेट ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या २ तासांत पूर्ण होईल. हा प्रकल्प जपानच्या सहकार्याने 'मेक इन इंडिया' अंतर्गत विकसित केला जात आहे.

Advertisement