Mumbai Ahmedabad Bullet Train A to Z Info: देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रवास कधी सुरू होणार? त्याचे तिकीट सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असेल का? या प्रश्नांची उत्तरे आता समोर आली आहेत. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या देशातील पहिल्या हायस्पीड ट्रेनचा पहिला टप्पा पुढील वर्षापासून म्हणजेच 15 ऑगस्ट 2027 पासून सुरू होणार आहे. सुरत ते बिलिमोरा या मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार असून, या प्रवासाच्या भाड्याबाबत रेल्वे मंत्रालय आणि नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने (NHSRCL) मोठी माहिती दिली आहे. या ट्रेनचे तिकीट विमान प्रवासापेक्षा स्वस्त आणि वेळेची प्रचंड बचत करणारे असणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा मुंबई-अहमदाबाद प्रवास अत्यंत सुकर होईल.
तिकीट किती असणार?
मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या 508 किलोमीटर प्रवासासाठी इकॉनॉमी क्लासचे कमाल भाडे साधारणपणे 3000 रुपये असण्याची शक्यता आहे. तर बिझनेस क्लासच्या तिकिटाची किंमत 4000 ते 4500 रुपयांपर्यंत असू शकते. प्रोजेक्टचा खर्च वाढल्यामुळे तिकिटांचे दर 6000 ते 7000 रुपये होणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र रेल्वेने हे वृत्त फेटाळून लावले आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे कि या ट्रेनचे भाडे मध्यमवर्गीयांचा विचार करूनच निश्चित केले जाईल, जेणेकरून सर्वसामान्य जनताही या सुविधेचा लाभ घेऊ शकेल. हे भाडे विमान आणि टॅक्सीच्या तुलनेत अतिशय परवडणारे असेल.
( नक्की वाचा : रत्नागिरीकरांनो तयार व्हा, लवकरच उडणार पहिलं विमान; वाचा पॅसेंजर टर्मिनल ते धावपट्टीपर्यंतचे सर्व अपडेट्स )
दुरंतो आणि राजधानी एक्सप्रेसपेक्षा दीडपट भाडे
बुलेट ट्रेनचे तिकीट हे दुरंतो एक्सप्रेसच्या फर्स्ट क्लास एसी तिकिटाच्या दीडपट ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या दुरंतोचे तिकीट 2250 रुपये असून, त्यानुसार बुलेट ट्रेनचे भाडे साधारण 3300 रुपयांच्या आसपास असेल. दुरंतो एक्सप्रेसने मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी 6 तास लागतात, मात्र बुलेट ट्रेन हाच प्रवास 2 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करेल.
राजधानीसारख्या सुपरफास्ट गाड्यांचे फर्स्ट एसीचे भाडे 2200 रुपये आहे, तर विमानाचे तिकीट सामान्यतः 4 ते 5 हजार रुपयांच्या दरम्यान असते. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रवास विमानापेक्षा स्वस्त आणि वेळेची बचत करणारा ठरेल.
( नक्की वाचा : महिन्याला 1 लाख रुपये कमावणाऱ्यांनाही शहरात मिळेना घर! रिअल इस्टेट मार्केटमधील नव्या ट्रेंडने वाढवली चिंता )
प्रकल्पाचे टप्पे आणि दोन वेगवेगळ्या कॅटेगरी
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोर टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी खुला केला जाईल. सुरत-बिलिमोरा या पहिल्या रूटनंतर वापी-सुरत, वापी-अहमदाबाद, अहमदाबाद-ठाणे आणि शेवटी अहमदाबाद-मुंबई हे सेक्शन सुरू केले जातील. या मार्गावर दोन प्रकारच्या बुलेट ट्रेन धावतील.
पहिली 'रॅपिड बुलेट ट्रेन' असेल, जी केवळ सुरत आणि वडोदरासारख्या 2 किंवा 3 प्रमुख स्थानकांवर थांबेल आणि सर्वात वेगवान असेल. दुसरी सामान्य बुलेट ट्रेन असेल, जी मार्गावरील सर्व 12 स्थानकांवर थांबेल. सर्व स्थानकांवर थांबल्यामुळे या ट्रेनला साधारण 1 तास अधिक वेळ लागेल.
( नक्की वाचा : Rental boyfriend : भारतात तासाच्या हिशोबाने बॉयफ्रेंड मिळायला सुरुवात, रेट कार्ड आणि अटी वाचल्या का? )
बुलेट ट्रेनची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये
- मुंबई ते अहमदाबाद अंतर: 508 किलोमीटर
- रॅपिड बुलेट ट्रेनचा प्रवासाचा वेळ: 1 तास 58 मिनिटे ते 2 तास 7 मिनिटे
- सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या ट्रेनचा वेळ: 2 तास 58 मिनिटे
- ट्रेनचा कमाल डिझाइन स्पीड: 350 किलोमीटर प्रति तास
- ट्रेनचा ऑपरेशनल स्पीड: 320 किलोमीटर प्रति तास
- वंदे भारत आणि सुपरफास्ट ट्रेनचा वेळ: 5.5 ते 7 तास
- कार किंवा बसने लागणारा वेळ: 8 ते 9 तास
- विमान प्रवास: 1 तास (मात्र एंट्री, चेकिंग आणि बोर्डिंग मिळून 4 ते 5 तास)
नफा कमावण्यापेक्षा सुविधा देण्यावर भर
बुलेट ट्रेन प्रकल्प चालवणाऱ्या NHSRCL कंपनीने स्पष्ट केले आहे कि या प्रकल्पाचा उद्देश केवळ नफा कमावणे हा नसून देशात भविष्यातील हायस्पीड रेल्वे विकासासाठी आवश्यक असणारी तांत्रिक आणि इंजिनिअरिंग समज निर्माण करणे हा आहे.
मुंबई-अहमदाबाद प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर दिल्ली-वाराणसी-सिलीगुडी या पुढील बुलेट ट्रेन प्रकल्पांचे काम पुढे नेले जाईल. हा प्रकल्प देशातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकणारा ठरेल.