गेट वे ऑफ इंडीया इथे एलिफंटा येथे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात झाला होता. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण या अपघातात जखमी झाले. नेव्हीच्या स्पिड बोटने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात नेरूळच्या रहिवाशी असलेल्या प्रज्ञा कांबळे यांचा ही मृत्यू झाला. प्रज्ञा या घरातील कमावत्या होत्या. संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. अशा स्थिती त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे संपुर्ण कुटुंब हे पोरकं झालं आहे. त्यांचा हा मृत्यू त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा धक्का आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रज्ञा कांबळे या नवी मुंबईतल्या नेरूळच्या रहिवाशी होत्या. त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांना दोन मुलं आहे. एक मुलगा बारावीला तर एक मुलगी नववीमध्ये शिकते. मिळेल ते काम करत त्या आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होत्या. दोन्ही मुलांची शिक्षण त्या करत होत्या. सध्या त्या नोकरीच्या शोधात होत्या. मुलांना मोठं करण्याचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात होतं. त्यासाठी त्या मेहनतही करत होता. पण नियतिच्या मनात काही तर वेगळचं होतं. 18 डिसेंबर हा दिवस त्यांच्यासाठी अखेरचा ठरला.
18 डिसेंबरला फावला वेळ असल्याने त्यांनी त्यांच्या मैत्रिणीं बरोबर गेट वे ऑफ इंडियाला जाण्याचा प्लॅन केला होता. गेट वे ला गेल्यामुळे आपण आता बोटींग करू असं त्यांनी ठरवलं. पुढे काय होणार आहे, याची त्यांना पुसटतीही कल्पना नव्हती. त्या आनंदी होत्या. फावला वेळ त्या ऐन्जॉय करत होत्या. दुसऱ्या प्रवाशां प्रमाणे त्यांनी ही नीलकमल या एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचं तिकीट घेतलं. त्या बोटीत ही बसल्या होत्या. पण काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या बोटीवर नेव्हीची स्पिड बोट आदळली. बोट बुडाली. अन्य प्रवाशीही बुडाले. त्यातले बरेच जण वाचले. पण प्रज्ञा कांबळे कमनशिबी ठरल्या. त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
ट्रेंडिंग बातमी - फिरायला आले, होत्याचं नव्हतं झालं... बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत
त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या नेरूळ इथल्या घरी आणला गेला. ज्या वेळी ही बातमी त्यांच्या मुलांना सांगितली गेली त्यावेळी त्यांच्या पाया खालची वाळू सरकली. त्यांच्या लहान लेकीने तर आपल्या मृत आईला पाहाताच हंबरडा फोडला. आई ऊठ ना. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना.असं ती म्हणत होती. त्यावेळी सर्व जण भावूक झाले. तिच्या नातेवाईकांनी तिला सावरण्याचे काम केलं. प्रज्ञा कांबळे यांचे मावस भाऊ यांनी तर या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. बोटीवरील प्रवाशांना लाईफ जॅकेट का दिली नाहीत? क्षमतेसाठी जास्त लोकांना का घेतलं गेलं? त्यावर कोणाचं नियंत्रण होतं का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.