राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ratnagiri News Today : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातून एक अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुंबईहून मे महिन्याच्या सुट्टीसाठी मूळ गावी आलेल्या एका 32 वर्षीय तरुणाचा तुळशी धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे तुळशी गणेशवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित बाळकृष्ण शिगवण (32) हे मुंबईत वास्तव्यास होते. दरवर्षीप्रमाणे मे महिन्याची सुट्टी घालवण्यासाठी ते आपल्या कुटुंबासह तुळशी गणेशवाडी या गावी आले होते. रविवारी 10 मे रोजी अमित त्यांच्या कुटुंबीयांसोबत गावातील तुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. निसर्गरम्य वातावरण पाहत असताना अमित यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात बुडाला.
अमित पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ माजली. मंडणगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र पाण्याचा अंदाज येत नसल्याने अखेर महाड येथील प्रसिद्ध 'साळुंखे रेस्क्यू टीम'ला पाचारण करण्यात आले. प्रशांत साळुंखे आणि त्यांच्या पथकाने शोधमोहीम राबवत अखेर अमित शिगवण यांचा मृतदेह चिखलात अडकलेल्या अवस्थेत शोधून काढला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालय मंडणगड येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळशी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >> Mumbai News: मराठीला डावलणाऱ्यांना मुंबईत जागा नाही! 'या' नगरसेवकाने प्रशासनाची उडवली झोप, प्रकरण काय?
गावावर शोककळा आणि प्रशासनाबद्दल नाराजी
ऐन सुट्टीत आनंदाने गावी आलेल्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने शिगवण कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तुळशी धरण परिसरात पर्यटकांची आणि स्थानिकांची मोठी वर्दळ असते, तरीही तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था, सावधानतेचे फलक किंवा जीवरक्षक का नाहीत? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच एका उमद्या तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पंधरा मित्र-मैत्रिणींच्या ग्रुप अमरावतीत गेला होता. येथील फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील घातखेडा बंधाऱ्यात मोठी दुर्घटना घडली. सेल्फी काढण्याच्या नादात चार जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली होती.मृतांमध्ये दोन सख्खे भावंडही होते. हे चार जण पाण्यात बुडाल्यानंतर इतर मित्रांनी आरडाओरडा केला होता. पंरतु,त्यांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं नाही.