मुंबई किनारी रस्ता प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंक यांना जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे लोकार्पण होणार आहे. रविवार 26 जानेवारी रोजी हे लोकार्पण होणार आहे. या पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर वाहतुकीवरील ताण निश्चित कमी होणार आहे. शिवाय मुंबईकरांचा प्रवास ही सुलक्ष होण्यास मदत होईल. या पुलाचे लोकार्पण जरी 26 जानेवारीला होणार असले तरी प्रत्यक्ष वाहतूकीला दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार 26 जानेवारीला होणार आहे. त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांना कोस्टल रोडवर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पण देखील याचवेळी होणार आहे. सोमवारी 27 जानेवारी पासून या सर्व मार्गिंकावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे. तसेच मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा किनारी रस्ता उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची 94 टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून 12 मार्च 2024 ते 31 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत 50 लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी 18 ते 20 हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.
या प्रकल्पातील दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यातील दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण 12 सप्टेंबर 2024 ला झाले. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी या दक्षिण वाहिनी पुलावरून वांद्रेकडे जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरून नियमित वाहतूक सुरू होणार आहे.
लोकार्पण होणाऱ्या पुलाची लांबी 827 मीटर इतकी आहे. यामध्ये समुद्रावर असलेली लांबी 699 मीटर तर पोहोच रस्ता 128 मीटर यांचा समावेश आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे 2400 मेट्रिक टन वजनाचा बो आर्च स्ट्रिंग गर्डर वापरला गेला. याची लांबी 143 मीटर तर रुंदी 27 मीटर आणि उंची 31 मीटर इतकी आहे.