Mumbai-Delhi 26/11 Style Attack Averted: देशावरील एका भीषण दहशतवादी हल्ल्याचं कट उधळण्यात आला आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी वेळीच धाडसी कारवाई करत हा कट उधळून लावला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीशी संबंधित 9 अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आर्थिक राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली होती. मुंबईवर झालेल्या 26/11 सारख्या भीषण हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा या टोळीचा डाव असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दाऊद इब्राहिम आणि ISI चे हातमिळवणी
अटक करण्यात आलेले हे 9 संशयित अतिरेकी केवळ सीमेपलीकडून आलेल्या सूचनांवर काम करत नव्हते, तर त्यांना थेट दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कची साथ मिळत होती. या मॉड्यूलमध्ये दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील स्थानिक गुंडांचा समावेश असून काही परदेशी नागरिकही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. पाकिस्तानची ISI आता थेट भारताच्या आतल्या गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून देश दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
( नक्की वाचा : Dhurandhar 2 मधील दाऊदचं आजारपण खरं की खोटं? वाचा अंडरवर्ल्डच्या पडद्यामागचं सत्य सांगणारा विशेष Review )
मुंबई आणि दिल्लीतील महत्त्वाची ठिकाणे निशाण्यावर
या दहशतवाद्यांनी देशातील अतिसंवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. त्यांच्या हिटलिस्टवर रेल्वे स्थानके, विमानतळ, पॉवर प्लांट आणि महत्त्वाच्या सरकारी इमारती होत्या. मुंबईतील गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करून मोठा नरसंहार घडवून आणण्याचा त्यांचा कट होता. आत्मघातकी हल्ले (Suicide Attacks) आणि वाहनांमध्ये आयईडी (IED) स्फोटके ठेवून मोठी हानी पोहचवण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते.
मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या कारवाईत केवळ दहशतवाद्यांनाच पकडले नाही, तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे, ग्रेनेड्स आणि पाकिस्तानातून पाठवलेली स्फोटके जप्त केली आहेत. हे सर्व साहित्य दहशतवादी हल्ल्यासाठी सज्ज ठेवण्यात आले होते. या अतिरेक्यांना परदेशातून कोणाकडून सूचना मिळत होत्या आणि त्यांना होणारा आर्थिक पुरवठा (Funding) कोणत्या माध्यमातून होत होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
देशात हाय अलर्ट जारी
या अटकेनंतर मुंबई आणि दिल्लीसह देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे. शत्रू राष्ट्राने भारताच्या नागरिकांनाच भारताविरुद्ध भडकवून आणि अंडरवर्ल्डच्या मदतीने हा नवा कट रचला होता, जो सुदैवाने वेळीच उधळला गेला आहे.