रिझवान शेख, प्रतिनिधी
Mumbai Mumbra Train Accident : मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी (9 जून) झालेल्या अपघातात 4 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. दोन लोकल ट्रेनमधील प्रवाशांचा धावत्या ट्रेनमध्ये एकमेकांना धक्का लागल्याने काही प्रवाशी ट्रकवर पडून हा अपघात झाला. या अपघाताबाबत एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेनं या अपघाताबाबतचा इशारा यापूर्वी दिला होता. तो इशारा प्रशासमानं गांभीर्यानं घेतला असता तर कदाचित हा अपघात टळला असता अशी भावना आता व्यक्त होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय दिला होता इशारा?
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील वळणावर अपघात होऊ शकतो, असे मुंबई रेल्वे प्रवासी संघानं सूचित केले होते. मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंद पाटील यांनी याबाबत तक्रार केली होती. रेल्वे मंत्रालय, रेल्वे जनरल मॅनेजर, रेल्वे DRM यांना ही तक्रार करण्यात आली होती.
मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या 3/4 नंबर प्लेटफॅार्म नंबरच्या दोन्ही बाजूला रेल्वे ट्रॅकचे अती वळण असल्याचे या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले होते. 21 फेब्रुवारी 2025 या दिवशी ॲानलाईन तक्रारा तसंच X च्या माध्यमातून याबाबत सूचना दिली होती. प्रशासानं या तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित हा अपघात टळला असता, अशी भावना आता व्यक्त होत आहे.
मुंब्रा स्थानकाजवळील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 च्या ट्रॅकवरील टर्निंग पॉईंट आजच्या अपघातानंतर चर्चेत आला आहे. कारण स्थानकाजवळ येताना मोठं वळण याठिकाणी आहे. त्यामुळे दोन रेल्वे ज्यावेळी येथून विरुद्ध दिशेने जातात त्यावेळी त्यांच्यातील अंतर तुलनेने कमी होती. याशिवाय वळण असल्याने दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागण्याचाही धोका असतो. सोमवारी तेच घडलं.