Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये रक्ताचा सडा! जागेच्या किरकोळ वादातून प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

मुंबईहून अंबरनाथला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री जागेच्या वादातून एका प्रवाशावर कोयत्याने भीषण हल्ला करण्यात आला. ही घटना ठाकुर्ली स्थानकाजवळ घडली असून, जखमी प्रवाशाला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई

मुंबईहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री जागेच्या किरकोळ वादातून एका प्रवाशावर कोयत्याने भीषण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रक्तरंजित हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला तातडीने कल्याण येथील महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ठाकुर्ली स्टेशनवर घडला थरार

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री 12.10 वाजताच्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्थानकात घडली. अंबरनाथ लोकलच्या एका जनरल डब्यामध्ये दोन प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून जोरदार वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. ट्रेन ठाकुर्ली स्थानकात प्रवेश करत असतानाच, वाद घालणाऱ्या प्रवाशाच्या बाजूने आलेल्या तीन जणांनी अचानक दुसऱ्या प्रवाशावर कोयत्याने सपासप वार केले. चालत्या ट्रेनमध्ये अचानक शस्त्र उपसल्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये एकच घबराट आणि पळापळ निर्माण झाली.

Advertisement

(नक्की वाचा-  Pimpri Chinchwad News: "आई मी नदीत उडी मारतोय..."; रात्रीच्या वेळी लंडन ब्रिजवर उभं राहून व्हिडीओ कॉल, अन्...)

आरोपी फरार

हल्ला केल्यानंतर लोकल स्थानकावर थांबताच तीनही हल्लेखोर गर्दीचा फायदा घेऊन ट्रेनमधून उतरले आणि पसार झाले. लोकल थेट कल्याण स्थानकात पोहोचल्यानंतर तेथे तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत जखमी प्रवाशाला डब्यातून ताब्यात घेतले आणि तातडीने रुग्णालयात रवाना केले. रेल्वे पोलीस सध्या ठाकुर्ली स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

दुसऱ्या घटनेत लोकलमध्ये 'फिल्मी स्टाईल' हाणामारी

या कोयता हल्ल्याच्या घटनेपाठोपाठ मुंबई लोकलमधील सुरक्षेचे धिंडवडे काढणारा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये लोकलच्या डब्यात काही प्रवासी एकमेकांना बेदम मारहाण करताना, लाथाबुक्क्यांनी तुडवताना दिसत आहेत.

अतिशय धक्कादायक बाब म्हणजे, या हाणामारी दरम्यान एका व्यक्तीकडून “मशीन काढ” अशी उघड धमकीवजा हाक ऐकू येत असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे. हा वाद नेमका कोणत्या स्थानकादरम्यान आणि कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या व्हिडिओमुळे प्रवाशांच्या अंगावर काटा आला आहे.


 


Topics mentioned in this article