Mumbai Cyber Fraud: फेसबुकवर भेटल्या चारचौघी, आजोबांची रिकामी झाली तिजोरी; 9 कोटी गमावल्याने जडला स्मृतीभ्रंश

Mumbai Cyber Fraud: आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्या वृद्धाला मोठा धक्का बसला आणि त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईमध्ये सायबर फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका 80 वर्षांच्या वृद्धाला 21 महिन्यांच्या कालावधीत ₹9 कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. या घोटाळ्यात 734 ऑनलाइन व्यवहारांचा समावेश असून, चार वेगवेगळ्या महिलांच्या नावाने ही फसवणूक करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या मुलाला संशय आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी 22 जुलै 2025 रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

( नक्की वाचा: देवाच्या दारात रक्तरंजित थरार! प्रेयसीवर सपासप वार; नागपुरमध्ये भयंकर घडलं )

आजोबांसोबत नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, या 80 वर्षीय व्यक्तीची एका महिलेसोबत एप्रिल 2023 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. या महिलेने तिचे नाव 'शर्वी' असे सांगितले. सुरुवातीला फेसबुकवर आणि नंतर व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांच्यात संवाद सुरू झाला. कालांतराने, 'शर्वी'ने मुलांच्या तब्येतीचे कारण देत त्या वृद्धाकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 'कविता' नावाच्या दुसऱ्या महिलेने त्या व्यक्तीला मेसेज पाठवून पैशांची मागणी केली.

'शर्वी'नंतर 'दिनाज' आली

फसवणुकीचे हे चक्र इथेच थांबले नाही. काही दिवसांनी 'दिनाज' नावाच्या महिलेने स्वतःला 'शर्वी'ची बहीण असल्याचे सांगितले आणि 'शर्वी'चा मृत्यू झाल्याचे खोटे कारण देऊन हॉस्पिटलच्या बिलांसाठी पैशांची मागणी केली. जेव्हा या वृद्धाने आपले पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला, तेव्हा 'दिनाज'ने आत्महत्या करण्याची धमकी दिली. यानंतर 'जस्मिन' नावाच्या आणखी एका महिलेने 'दिनाज'ची मैत्रीण असल्याचे सांगून त्या वृद्धाला पैशांसाठी ब्लॅकमेल केले.

( नक्की वाचा: अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची हत्या; दिल्लीतील घटनेने खळबळ )

या फसवणुकीमुळे त्या वृद्धाची आयुष्यभराची जमापुंजी संपली, एवढेच नव्हे तर त्यांनी कुटुंबातील सदस्यांकडूनही पैसे घेतले. अखेर, त्यांच्या मुलाला या सततच्या आर्थिक व्यवहारांवर संशय आल्यानंतर त्यांनी वडिलांकडे चौकशी केली. या चौकशीत वडिलांनी संपूर्ण प्रकार सांगितला. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्या वृद्धाला मोठा धक्का बसला आणि त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले, जिथे त्यांना 'स्मृतीभ्रंश' (Dementia) असल्याचे निदान झाले.

Advertisement

एकाच व्यक्तीने फसवल्याचा संशय

या घटनेमुळे सायबर गुन्हेगारांनीविविध मार्गांनी लोकांना कशाप्रकारे जाळ्यात ओढले आहे, हे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.  सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्याचा धोका किती असतो ते देखील  या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. चार महिलांची नावे धारण करून या वृद्धाला फसवणारी एकच व्यक्ती असल्याचा पोलिसांना संशय असून त्यांनी आरोपाचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

Topics mentioned in this article