जाहिरात

Mumbai Metro: वसई-विरारसाठी सर्वात मोठी बातमी! मेट्रो 13 ला मंजुरी, असा असणार 25 किमीचा नवा मार्ग

Mira Bhayandar Vasai Virar Metro 13: मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Mumbai Metro: वसई-विरारसाठी सर्वात मोठी बातमी! मेट्रो 13 ला मंजुरी, असा असणार 25 किमीचा नवा मार्ग
या मार्गावर एकूण 16 स्थानके प्रस्तावित आहेत. (प्रतिकात्मक फोटो )
मुंबई:

Mira Bhayandar Vasai Virar Metro 13: मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानच्या मेट्रो 13 या नव्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर आणि वसई-विरार हा संपूर्ण परिसर मुंबईशी थेट जोडला जाणार असून प्रवाशांचा वेळ तब्बल 50 टक्क्यांनी वाचणार आहे.

मेट्रो 13 चा मार्ग कसा असेल?

ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या मेट्रो मार्गाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च 17724.99 कोटी रुपये इतका आहे. या मार्गाची एकूण लांबी 25.03 किलोमीटर असून, त्यापैकी 21.78 किलोमीटर मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) तर 3.25 किलोमीटर मार्ग भूमिगत असणार आहे. 

या मार्गावर एकूण 16 स्थानके प्रस्तावित असून त्यात 13 उन्नत आणि 3 भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. हा मार्ग मीरा रोड, नायगाव, वसई, नालासोपारा आणि विरार या भागांना थेट जोडेल.

वसई खाडीवर डबल डेकर पूल आणि चिखल डोंगरीत डेपो

या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वसई खाडीवर उभारला जाणारा भव्य एकत्रित पूल असणार आहे. पांजू बेटाला जोडणाऱ्या 4.92 किलोमीटर लांबीच्या या पुलावर खाली 6 पदरी रस्ता आणि वर मेट्रो मार्ग असेल. 

या प्रकल्पाचा मुख्य मेट्रो डेपो चिखल डोंगरी येथे प्रस्तावित आहे. हा मेट्रो मार्ग नायगाव, नालासोपारा आणि विरार उपनगरीय रेल्वे स्थानकांशी जोडला जाईल, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे मेट्रो मार्ग 9 सोबत त्याची जोडणी केली जाणार आहे. सर्व स्थानकांवर फीडर बस सेवाही उपलब्ध करून दिली जाईल.

कधीपर्यंत होणार काम पूर्ण?

प्रकल्पासाठी एकूण 24.84 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असून, येत्या 6 महिन्यांत भूसंपादन आणि पोहोच रस्ते तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मान्यता मिळाल्यापासून पुढील 5 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

2031 पर्यंत या मार्गावरून दररोज सुमारे 4.49 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मेट्रोमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com