BMC commissioner Ashwini Bhide : मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसात शहरातील पायाभूत सुविधांच्या मर्यादा ठळकपणे समोर आल्या आहेत. या पावसात मुंबईत अनेक ठिकाणी झाडं पडली. चेंबूरमध्ये स्कुलबसवर झाड पडल्यानं एका शाळेतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर साकिनाकामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडल्यानं एका मुंबईकराला आपला जीव गमावाला लागला. या सर्व घटनांमुळे मुंबई महापालिका आयुक्तांवर जोरदार टीका होत आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या सर्व प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे,
गेल्या 4 वर्षांपासून महापालिका मॅनहोलच्या समस्येवर सातत्याने आणि व्यवस्थित काम करत आहे. मात्र, अत्यंत सूक्ष्म पातळीवर म्हणजेच मायक्रो लेव्हलवर काम करण्यात आम्ही कमी पडलो, अशी प्रांजळ कबुली आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली आहे. मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये प्रशासकीय शिस्तीचे पालन होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
मॅनहोलच्या तक्रारींसाठी व्हॉट्सॲप क्रमांक आणि पोर्टल
मुंबईत सध्या 1 लाखापेक्षा जास्त मॅनहोल्स असून या सर्वांचे जिओ टॅगिंग पूर्ण करण्यात आले आहे. मॅनहोल संदर्भातील तक्रारी नागरिकांना थेट मांडता याव्यात, यासाठी लवकरच एक व्हॉट्सॲप क्रमांक आणि विशेष पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकतील. मॅनहोलबाबतचे मायक्रो लेव्हलचे काम आतापासूनच सुरू करण्यात आले असून, पुढच्या वर्षापासून यावर आणखी वेगाने काम केले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
( नक्की वाचा : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडक मोहीम हायकोर्टात फेल, ऐतिहासिक गोरस भांडाराचा FDA विरुद्ध मोठा विजय )
झाडे कोसळण्याची संख्या वाढली
मुंबईत मोठ्या प्रमाणावर झाडे पडण्याच्या घटनांवरही आयुक्त आश्विनी भिडे यांनी सविस्तर भूमिका मांडली. मुंबईत यंदा फूटपाथवरील झाडे मोठ्या संख्येने पडली आहेत. वर्षभरात जेवढी झाडे पडतात, त्याच्या 50 टक्के झाडे यंदा एकाच दिवसात पडल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. आकडेवारीनुसार, यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 883 झाडे आणि 1138 मोठ्या फांद्या पडल्याची नोंद झाली आहे.
आयुक्तांनी फेटाळला तो आरोप
शहरात झालेल्या सिमेंट काँक्रीटीकरणामुळेच झाडे पडत असल्याचा दावा आयुक्त आश्विनी भिडे यांनी फेटाळून लावला आहे. सरसकटपणे सिमेंट काँक्रीटीकरणामुळेच झाडे पडली असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उलट सिमेंट काँक्रीटीकरण केल्यामुळे मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नवीन एसओपी येणार
ज्या भागात मोठी झाडे पडली आहेत, तिथे चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. मात्र, शहरात वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वेगवेगळ्या युटिलिटीजसाठी सतत खोदकाम होत असते. त्यामुळे नेमक्या कोणाच्या खोदकामामुळे झाडांच्या मुळांना धोका निर्माण झाला आणि ती कमकुवत झाली, हे निश्चित करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि झाडांचे जतन करण्यासाठी तज्ज्ञांच्या सहकार्याने येत्या काळात एक नवीन एसओपी म्हणजेच मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात येणार आहे.