VIDEO: काय सांगता! मुंबईच्या पेडर रोडवर चक्क मोरांचा वावर! डोळ्यांचे पारणे फेडणारा व्हिडिओ तुफान VIRAL

Mumbai Pedder Road peacocks video : मुंबईत पावसाचे आगमन होताच असाच एक कमालीचा आणि जादुई नजराणा दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात पाहायला मिळाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mumbai Pedder Road peacocks video : मुंबईच्या रस्त्यावर चक्क मोर अवतरले होते.
मुंबई:

Mumbai Pedder Road peacocks video : कधीही न थांबणारं, घड्याळ्या काट्यावर धावणारं शहर म्हणजे मुंबई. मुंबईतील काँक्रीटच्या जंगलांमध्ये सहसा ट्रॅफिकची डोकेदुखी पाहायला मिळते. मात्र, जरा विचार करा, याच गजबजलेल्या रस्त्यावर जर देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर आपल्या संपूर्ण कुटुंबासह अचानक फिरायला आला तर... तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. 

मुंबईत पावसाचे आगमन होताच असाच एक कमालीचा आणि जादुई नजराणा दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात पाहायला मिळाला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत मान्सूनने दमदार हजेरी लावली आणि मुसळधार पाऊस सुरू होताच, मोर आणि लांडोरींचा एक मोठा झुंड रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला. सोशल मीडियावर या सुंदर दृश्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

Advertisement

मुंबईच्या व्हीआयपी रस्त्यावर मोरांची सहल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मोर पेडर रोडवर अत्यंत बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत, जणू काही त्या एखाद्या जंगलातच वावरत आहेत. शहराचा हा कोलाहल, गजबजलेले रस्ते आणि वाहनांची ये-जा या कशाचीही भीती त्यांच्यात दिसत नाही. 

त्याच वेळी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये, केम्प्स कॉर्नर परिसरातील एका उंच इमारतीच्या बाल्कनीच्या रॅलिंगवर एक सुंदर मोर डौलात बसलेला पाहायला मिळत आहे. मुंबईच्या गगनचुंबी इमारतींच्या पार्श्वभूमीवर मोराचे हे नैसर्गिक सौंदर्य पाहून तिथून जाणारे पादचारी आणि वाहनचालकही घटकाभर थांबले आणि त्यांनी हा अद्भूत क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

हे सुंदर पाहुणे आले कुठून?

हे अनोखे दृश्य कॅमेऱ्यात टिपणाऱ्या एका इंस्टाग्राम युझरने लिहिले की, मुंबईसारख्या शहरात असे दृश्य पाहणे हा खरोखरच एक दुर्मिळ आणि आनंददायी अनुभव होता. मंगळवारी संध्याकाळी जेव्हा मुंबईत मान्सूनच्या पावसाच्या सरी बरसल्या, तेव्हा हे मोर जणू निसर्गाच्या सोबतीने मुंबईकरांना पावसाळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठीच रस्त्यावर आले होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबईतील इतक्या व्हीआयपी आणि सतत गर्दी असणाऱ्या भागात हे मोर अचानक आले कुठून, असा प्रश्न अनेकांना पडला होता.


( नक्की वाचा : Lohagad Fort: नरबळी ते भुतांचा वावर, 2000 वर्ष जुना लोहगड किल्ला महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी किल्ला का आहे?

सोशल मीडियावरील युझर्सनी उलगडले मोरांचे रहस्य

सोशल मीडियावरील युझर्स या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असून, अनेकांनी हे मोर कुठून आले असावेत याचे रहस्य उलगडले आहे. एका युझरने कमेंट करत लिहिले की, हे मोर जवळच असलेल्या टावर ऑफ सायलेन्स आणि गोदरेज बाग परिसरातून आले आहेत. 

पारसी समुदायाकडून हा परिसर सांभाळला जातो आणि तिथे खूप मोठी हिरवळ असल्याने तिथे अनेक मोर राहतात. दुसऱ्या एका युझरने माहिती दिली की, तिथल्या पारसी टॉवर ऑफ सायलेन्सच्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर झाडी आहे, त्यामुळे पहिल्या पावसाच्या आनंदात हे पक्षी टेकडीवरून खाली मुख्य रस्त्याकडे आले असावेत. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
 

Advertisement

Topics mentioned in this article