Lohagad fort Murder Case: लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर नुकत्याच घडलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडामुळे हा किल्ला पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आला आहे. एका दरीत पडून मृत्यू झाल्याची ही घटना सुरुवातीला अपघात वाटत होती, मात्र पोलिसांनी कसून तपास करत यामागील हत्येचा उलगडा केला आहे. या गुन्हेगारी घटनेचा किल्ल्यावरील रहस्यमय कथांशी कोणताही थेट संबंध नसला, तरी या दुर्दैवी प्रकरणामुळे लोहगड किल्ल्याभोवती असलेल्या 2000 वर्षांच्या गूढ व रहस्यमयी इतिहासावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला केवळ ट्रेकर्सचे आवडते ठिकाण नसून त्यामागे अनेक थरारक दंतकथा, भुताटकीचे दावे आणि न सुटलेली रहस्ये लपलेली आहेत.
2000 वर्षांचा इतिहास
लोणावळा परिसरात असलेल्या या लोहगडाचा इतिहास तब्बल 2000 वर्षे जुना आहे. या किल्ल्याचा पाया सातवाहन काळात रचला गेला असे मानले जाते. त्यानंतर 10 व्या ते 14 व्या शतकात याचे आणखी बळकटीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला अनन्यसाधारण लष्करी महत्त्व प्राप्त झाले.

मराठ्यांनी हा किल्ला जिंकून आणखी मजबूत केला आणि त्याचा वापर मुख्य प्रशासकीय केंद्र व खजिना ठेवण्यासाठी केला. पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. आज या किल्ल्याचे लष्करी महत्त्व संपले असले तरी त्याचे 4 भव्य दरवाजे, प्राचीन पाण्याचे टाके आणि विंचू काटा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
( Pune News : आधी पासपोर्ट चोरीला, मग लोहगडावर नेलं..केतनच्या वडिलांनी सांगितलं सियानं कसं केलं होतं हत्येचं प्लॅनिंग )
गणेश दरवाजा आणि नरबळीची थरारक दंतकथा
लोहगडाच्या अनेक कथांपैकी सर्वात जास्त चर्चिली जाणारी कथा म्हणजे गणेश दरवाजाची दंतकथा. हा किल्ल्याचा पहिला मुख्य दरवाजा आहे. स्थानिक लोककथांनुसार, एका अधिकाऱ्याला स्वप्न पडले होते की या दरवाजाचा पाया कमकुवत असून त्याला शाप मिळाला आहे. हा पाया मजबूत करण्यासाठी एका पुरुष आणि महिलेचा जिवंत नरबळी देण्यात आला आणि त्यांना पायाखाली गाडण्यात आले, असा दावा केला जातो.
इतिहासकार किंवा पुरातत्व विभागाकडे याचा कोणताही लेखी पुरावा नाही, मात्र स्थानिक गाईड्स आणि सोशल मीडियावरील ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स अजूनही ही कथा आवर्जून सांगतात. सावळे कुटुंबातील एका व्यक्तीने गावाच्या हक्कासाठी स्वतःचा बळी दिला, अशीही एक कथा येथे सांगितली जाते.
( नक्की वाचा : Pune News:सियाच्या अफेयरची घरातील मंडळींना होती कल्पना, 35 वर्षांच्या मैत्रीमध्ये कुणी कालवलं विष? वाचा... )
अदृश्य पहारेकरी आणि रात्रीचे गूढ आवाज
लोहगडावर केवळ दंतकथाच नाहीत, तर अनेक ट्रेकर्सनी येथे विचित्र अनुभव आल्याचे दावे केले आहेत. काही पर्यटकांच्या मते, पहाटेच्या वेळी किल्ल्याच्या तटबंदीवर काही सावल्या फिरताना दिसतात. एकाकी फिरणाऱ्या पर्यटकांना दूरवरून एक पहारेकरी उभा असलेला दिसतो, जो जवळ जाण्याचा प्रयत्न केला की अचानक गायब होतो.
याशिवाय, सूर्यास्तानंतर या किल्ल्याच्या शांत भागात कुणाच्या तरी चालण्याचा आवाज किंवा शिट्ट्यांचे आवाज ऐकू येत असल्याच्या चर्चा ट्रॅव्हल ब्लॉग्सवर पाहायला मिळतात. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा दाट धुके आणि वेगवान वारा असतो, तेव्हा हे आवाज जास्त ऐकू येतात. विज्ञानवादी लोकांच्या मते, किल्ल्याची रचना आणि डोंगरावरील वेगवान वारा यामुळे असे आवाज निर्माण होतात.
गुप्त बोगदे आणि लपलेला खजिना
भारतातील इतर प्राचीन किल्ल्यांपैकी लोहगडासोबतही गुप्त वाटा आणि लपलेल्या खजिन्याच्या अफवा जोडल्या गेल्या आहेत. शत्रूच्या वेढ्यातून सुटण्यासाठी या किल्ल्यावरून खाली जाण्यासाठी काही गुप्त बोगदे होते, असे स्थानिक सांगतात. तसेच युद्धाच्या काळात मिळवलेला मौल्यवान खजिना याच किल्ल्याच्या दगडी भिंतींमध्ये कुठणीतरी लपवून ठेवला आहे, अशीही एक लोककथा प्रसिद्ध आहे. या गोष्टींना कोणताही ठोस पुरावा नसला, तरी किल्ल्याचे रहस्य आणि पर्यटकांची उत्सुकता वाढवण्यासाठी या कथा कारणीभूत ठरतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world