BMC News : मुंबईतील वेगवेगळ्या आस्थापनामध्ये निर्माण होणारा कचरा संकलित करण्याचे कार्य बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने केले जाते. पण, एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) निवासी/व्यावसायिक संकुलातील ओल्या कचऱ्याची त्रयस्थ संस्थामार्फत वाहतूक करुन ते इतरत्र नेऊन टाकला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे, यापुढे एका ठिकाणी घाऊक प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या निवासी/व्यावसायिक संकुलातील ओल्या कचऱ्याची त्रयस्थ संस्थांमार्फत वाहतूक करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
संबंधित निवासी/व्यावसायिक आस्थापनांनी त्याठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर जागच्या जागी प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे किंवा संबंधित कचरा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द करणे अनिवार्य आहे, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. तसेच, जागीच कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांना मालमत्ता करातून सवलतदेखील देण्यात येईल, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.
मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम, योजना राबविल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) निवासी/व्यावसायिक संकुलातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे आणि ते इतरत्र कुठेही टाकले जाऊ नये, यासाठी व्यापक स्तरावर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या किंवा ५ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या आस्थापनांचा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांत (बल्क वेस्ट जनरेटर) समावेश होतो.
( नक्की वाचा : Dadar kabutar Khana: दादर पुन्हा तापणार? मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस )
याबाबतचा आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. (श्रीमती) जोशी म्हणाल्या, मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) एकूण २ हजार ६०९ आस्थापना आहेत. त्यापैकी, एकूण ७८४ आस्थापनांच्या परिसरातच कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. तसेच, ७२७ आस्थापना त्रयस्थ संस्थांना संबंधित कचरा देतात. तर, १ हजार ९८ आस्थापना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे कचरा सुपूर्द करतात. तथापि, या सर्व आस्थापनांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विभागातील सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकांनी दिनांक १५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीदरम्यान सर्वेक्षण करावे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांची नावे, त्यांच्याकडे कचऱ्यावर प्रक्रिया होते किंवा नाही, होत असल्यास कोणत्या संस्थेमार्फत ती केले जाते, त्यासाठी किती शुल्क आकारले जाते, आदी बाबींचा आढावा घ्यावा, असे निर्देश डॉ. जोशी यांनी दिले आहेत.
तसेच, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी यापुढे त्यांच्याकडील ओल्या कचऱ्याची त्रयस्थ संस्थांमार्फत वाहतूक करु नये. संबंधित ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर जागच्या जागीच प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावावी अथवा संबंधित कचरा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द करावा. निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर जागच्या जागी प्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता करात सवलत दिली जाते. संबंधित आस्थापनांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच आपला परिसर आणि पर्यायाने संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी केले.
( नक्की वाचा : Raju Patil : 15 ऑगस्टला 'मॅकडोनाल्ड, KFC बंद करणार का?'राजू पाटील यांचा KDMC ला संतप्त सवाल )
‘पिवळ्या कचरापेटी'चे वितरण
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन' (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही सेवा आता मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) आस्थापनांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे, अशा आस्थापनांनी या सेवेसाठी नोंदणी करुन त्यांच्याकडील घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे वर्गीकरण करुन ते महानगरपालिकेकडे सुपूर्द करावे.
तसेच, या सेवेअंतर्गत आजवर नोंदणी केलेल्या विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, श्रृंगार केंद्र (ब्यूटी पार्लर), महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या कचऱ्याच्या संकलनासाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या ‘पिवळ्या कचरापेटी'चे वितरण घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांनी दिली.
आतापर्यंत या कचरा संकलन सेवेसाठी नोंदणीकृत न झालेल्या आस्थापनांना आताही यासाठी नोंदणी करता येणार आहे. सेवेचा लाभ घेण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तथापि, मुंबईतील नोंदणीकृत आस्थापनांना व्हॉट्सॲप तसेच अन्य माध्यमातून क्यूआर कोड पाठविण्यात येत आहे. सदर, क्यूआर कोड स्कॅन करुनही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येईल, असेही श्री. दिघावकर यांनी सांगितले.