रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने संपूर्ण मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे अत्युच्च गुणवत्तेची व्हावीत, यासाठी महानगरपालिका प्रशासन आग्रही भूमिका घेत आहे. तसेच, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या किंवा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या व्यक्ती, संस्थांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. या अनुषंगाने, आरे वसाहतीतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामात अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारास महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या निविदा प्रक्रियेत पुढील दोन वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच 5 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महापालिकेच्या या बडग्यामुळे कंत्राटदारांनाच चांगलाच दणका बसणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या शिवाय स्लम्प टेस्टमध्ये त्रुटी आढळल्याने दोन रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. पुढील 6 महिन्यांसाठी महानगरपालिकेच्या कोणत्याही कामांसाठी काँक्रिट मिक्सचा पुरवठा करण्यास त्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच 2 रस्ते कंत्राटदारांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. रस्ते काँक्रिटीकरण कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, त्रुटी खपवून घेतली जाणार नाही, तसे आढळल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा देखील महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे.
महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे.31 मे 2025 पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णत्वास जावे, यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे. प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे. तसेच, रस्त्यांची कामे सुरू असताना अभियंत्यांनी उपस्थित रहावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यस्थळी आकस्मिक भेट द्यावी, कामे अधिक वेगाने पार पाडताना गुणवत्तेवरही भर द्यावा आणि निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देशगगराणी यांनी दिले आहेत.
आरे वसाहतीतील दिनकरराव देसाई मार्गाचे सिमेंट काँक्रिट व मास्टिक अस्फाल्ट सुधारणा काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यामुळे कंत्राटदारास नोटीस बजावण्यात आली. तसेच, दंडाची आकारणी करुन निकृष्ट काम त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, दुरुस्तीच्या कामात देखील कंत्राटदाराने अक्षम्य दिरंगाई केली. याबाबत कंत्राटराकडून खुलासा मागवण्यात आला, परंतु समाधानकारक खुलासा नसल्यामुळे कंत्राटदारास महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या निविदा प्रक्रियेत पुढील 2 वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच 5 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
बांगर यांनी 20 मार्चला रात्री 'एम पूर्व' विभागातील डॉ. नीतू मांडके मार्ग येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान स्लम्प चाचणी घेण्यात आली. रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पस्थळी आढळलेला स्लम्प 160 मिमी इतका होता, तर प्रत्यक्ष कार्यस्थळी स्लम्प 170 मिमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे काँक्रिटीकरणासाठी आलेले मिश्रण नाकारण्यात आले. संबंधित मिक्सर वाहन माघारी पाठविण्यात आले. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराकडून खुलासा मागविण्यात आला. मात्र, खुलासा समाधानकारक नसल्याने या प्रकारातील हलगर्जीपणाबाबत संबंधित रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पास 20 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच, पुढील 6 महिन्यांसाठी महानगरपालिकेच्या कोणत्याही कामांसाठी काँक्रिट मिक्सचा पुरवठा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
काँक्रिट रस्ते कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी महानगरपालिका अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. कामात त्रुटी आढळल्या तर जबाबदार व्यक्ती, संस्था यांच्याविरोधात अत्यंत गंभीर कारवाई केली जाऊ शकते, असं बांगर म्हणाले. या दृष्टिकोनातून रस्ते कामांत सर्व कंत्राटदारांनी अधिक सजग राहणे अपेक्षित आहे. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दोषींवर सक्त कारवाई केली जाईल, असे बांगर यांनी स्पष्ट केले आहे.