शाळेत लहान मुलांना मारू नये असा नियम आहे. पण या नियमाला काही ठिकाणी हरताळ फासला जात आहे. मुंबईतल्या एका नामांकीत शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत असलेल्या मुलाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विरोधात पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तर शिवसेना शाखा प्रमुख राजन गजरे यांनी ही शाळेवर धडक देत जाब विचारला आहे. त्यानंतर शाळा प्रशासनाने झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितल्याचं गजरे यांनी सांगितलं. विद्यार्थ्याच्या आईनं झालेला सर्व प्रकार त्यानंतर माध्यमां समोर सांगितला आहे.
ही शाळा मुंबईतल्या मुलंडमध्ये आहे. या शाळेत हा विद्यार्थी दुसऱ्या वर्गात शिकतो. त्याचे केस वाढले होते म्हणून वर्गातल्या शिक्षिकेने आधी त्याचे केस रबरने घट्ट आवळून बांधले होते. दुसऱ्या दिवशी परत त्याच विद्यार्थ्याला शिक्षिकेने थोबाडीत लगावले. त्यात त्याचा गाल सुजला होता. तो दिसू नये म्हणून त्यावर थंड पाणी आणि टिश्यू लावण्यात आला असं पीडीत विद्यार्थ्याच्या आईने सांगितले. तिसऱ्या दिवशी परत त्याच शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याला स्टीलच्या पट्टीने मारलं.
त्याचे वण त्याच्या हातावर स्पष्ट पणे दिसत होते. त्याच्या शीरा सुचल्या होत्या. यानंतर विद्यार्थ्याला दवाखान्यात घेवून गेल्याचं मुलाच्या आईने सांगितलं. डॉक्टरांनीही त्याला मारहाण झाली आहे असं सांगितल्याचं आईने सांगितलं. याबाबतची तक्रार त्यांनी शाळेकडे केली. शिवाय त्या मदतीसाठी शिवसेना शाखा प्रमुख राजन गजरे यांच्याकडे गेल्या. हे प्रकरण गंभीर असल्याने शिवसैनिक शाळेवर धडकले. त्यांनी शाळेला याबाबत जाब विचारला.
नक्की वाचा - डी मार्टच्या बिस्किटमध्ये अळ्या आढळल्या, अन्न आणि औषध प्रशासन म्हणतं...
शाळा प्रशासनाने झालेला प्रकाराबाबत माफी मागितल्याचं राजन गजरे यांनी सांगितलं. शिवाय ज्या शिक्षिकेने मारहाण केली ती नवीन असल्याचं ही सांगण्यात आलं. आपण त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वास शाळा प्रशासनाने दिले असल्याचं गजरे यांनी माध्यमाबरोबर बोलताना सांगितलं. फळ्यावर लिहीलेला अभ्यास वहीत लिहीण्यात संबंधीत विद्यार्थ्याला उशीर होत होता त्यामुळे शिक्षिकेने अशी शिक्षा त्या विद्यार्थ्याला दिली.