मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुरक्षित प्रवासासाठी आता स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन-एसी लोकल लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (ICF) या लोकलचे काम अंतिम टप्प्यात असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत ती मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकलचे उत्पादन सुरू झाले आहे. ही लोकल मध्य किंवा पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात फेब्रुवारीच्या अखेरीस सामील होईल. यासोबतच 15 डब्यांच्या आणखी तीन लोकल देखील मुंबईला मिळणार आहेत.
गुदमरल्यासारखे होणार नाही!
स्वयंचलित दरवाजे असल्यामुळे डब्यातील हवा खेळती राहण्याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. यावर उपाय म्हणून आयसीएफने विशेष तंत्रज्ञान वापरले आहे. छताच्या बाजूने 'फोर्ड व्हेंटिलेशन' यंत्रणा बसवण्यात आली आहे, जी डब्यातील हवेचा दाब संतुलित ठेवेल. ही प्रणाली डब्यातील कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकून ऑक्सिजनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करेल. डब्यांच्या दरवाज्यांवर आणि आतील भागात जाळी बसवण्यात येणार आहे, ज्यामुळे सुरक्षितता अधिक वाढेल. लोकमतने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- गुड न्यूज! भारत-EU करारामुळे BMW, मर्सिडीजच्या किमती घटणार; आयात शुल्कात मोठी कपात?)
यापूर्वी पश्चिम रेल्वेवर अशा प्रकारचा प्रयोग झाला होता, तेव्हा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. मात्र, रेल्वेच्या तांत्रिक विभागाने स्पष्ट केले आहे की, नव्या लोकलचे डिझाइन पूर्णपणे बदलण्यात आले आहे. कोणतीही लोकल सेवेत आणण्यापूर्वी तिची सखोल तांत्रिक चाचणी केली जाते. ही व्हेंटिलेशन प्रणाली यशस्वी ठरल्यास मुंबई लोकलच्या संचालनात हा एक क्रांतीकारी बदल ठरेल.
नव्या लोकलचे फायदे काय होतील?
दरवाजे स्वयंचलित असल्याने प्रवासी चालत्या ट्रेनमधून पडण्याच्या घटनांना आळा बसेल. दरवाजाजवळ लटकणाऱ्या प्रवाशांमुळे होणारे अपघात टाळता येतील. एसी लोकलचे तिकीट परवडत नसलेल्या सामान्य प्रवाशांना नॉन-एसी दरात बंद दरवाजांच्या लोकलचा सुरक्षित प्रवास मिळेल.