Mumbai-Pune Expressway Traffic Chaos: मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेसवेवर गेल्या काही दिवसांत प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुमारे 36 तास चाललेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून या परिस्थितीला प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
विशेषतः घाटातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाला होत असलेला विलंब आता प्रवाशांच्या जिवावर उठला आहे. घाटातील अरुंद आणि अपघाती वळणांमुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा होता, मात्र त्याच्या पूर्णत्वास लागणारा वेळ सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
प्रकल्पाच्या डेडलाईनमध्ये वारंवार वाढ
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मार्च 2019 मध्ये 13.5 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू केले होते. मूळ नियोजनानुसार हे काम 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर कोरोना महामारीचे कारण पुढे करत ही मुदत 2024 पर्यंत वाढवण्यात आली.
(नक्की वाचा : Mumbai Pune Expressway अन्न ,पाणी नाही,टॉयलेटही नाही, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील प्रवाशांची अवस्था कशी आहे? )
धक्कादायक बाब म्हणजे, 2024 उजाडल्यानंतरही काम पूर्ण झाले नाही आणि आता या प्रकल्पाची नवी डेडलाईन 1 मे 2026 ही देण्यात आली आहे. सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांमध्ये दोन बोगदे आणि दोन मोठे पूल बांधण्याचे आव्हान असल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे. मात्र तांत्रिक प्रगती झाली असतानाही इतका वेळ का लागतो, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कोकण रेल्वेच्या कामाशी तुलना आणि प्रशासनावर टीका
नागरिक आणि विविध संघटनांनी या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी 1990 च्या दशकात उभारल्या गेलेल्या कोकण रेल्वेचे उदाहरण दिले आहे. 740 किलोमीटर लांबीचा कोकण रेल्वे प्रकल्प, ज्यामध्ये 90 बोगदे आणि जवळपास 2000 पूल होते, तो केवळ 8 वर्षांत पूर्ण करण्यात आला होता. त्यावेळी आजच्या तुलनेत आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते.
आज सर्व अत्याधुनिक सोयी असतानाही केवळ 13.3 किलोमीटरच्या प्रकल्पाला इतकी वर्षे का लागत आहेत, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सुमारे 6500 कोटी रुपये सार्वजनिक निधीतून खर्च होत असलेल्या या प्रकल्पातील दिरंगाई संशयास्पद वाटत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
( नक्की वाचा : Solapur News : पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन, सोलापूरसाठी प्रगतीचे वरदान; असा होणार मोठा फायदा )
प्रशासकीय उदासीनतेचा प्रवाशांना मोठा फटका
नुकत्याच झालेल्या 36 तासांच्या ट्रॅफिक जॅममुळे हजारो प्रवासी आणि वाहने रस्त्यावर अडकून पडली होती. यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेले. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या संपूर्ण परिस्थितीवर कडक शब्दांत टीका केली आहे. प्रशासकीय अनास्था आणि नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे हेच या सर्व संकटाचे मूळ कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रशासन जेव्हा संवेदनशील नसते, तेव्हा सामान्य नागरिकांना अशा प्रकारे हाल सोसावे लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे आता पायाभूत सुविधांच्या कामात उत्तरदायित्व निश्चित करण्याची आणि कामाचा वेग वाढवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.