Mumbai-Pune Expressway Traffic Update Today: 3 फेब्रुवारी रोजी मुंबई पुणे एक्सप्रेसवे पूर्णपणे जाम झाला होता. या मार्गावर झालेली कोंडी तब्बल 33 तास फुटली नव्हती. गँस टँकर उलटल्याने मुंबईकडे येणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले होते. गुरुवारी म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी हा मार्ग पुन्हा जाम जाला आहे. 3 तारखेला जिथे वाहतूक कोंडी झाली होती, तिथेच आज पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळ्याचा घाट हा डोकेदुखी बनला असून इथे वरचेवर वाहतूककोंडी होऊ लागली आहे. 3 तारखेला झालेल्या वाहतूककोंडीनंतर पुणे जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याच्या घोषणा केली होती, मात्र ही घोषणा हवेत विरल्याचे गुरुवारच्या कोंडीमुळे दिसून आले आहे.
वाहतूककोंडी होऊ नये म्हणून काय निर्णय घेतले होते? ऐका
गुरुवारी खंडाळ्याच्या घाटात पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक मुंगीच्या पावलाने पुढे सरकताना दिसत होती. काही ठिकाणी वाहने जागची हलतच नसल्याचे दिसून आले होते. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरही खंडाळ्याच्या घाटात वाहतूककोंडी झाली होती. थोडक्यात सांगायचे झाल्यास लोणावळा आणि खंडाळा परिसरात मुंबई आणि पुणे दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहतुकीची कोंडी झाली होती. काही प्रवाशांनी X वर टाकलेल्या पोस्टवर नजर टाकल्यास सकाळी सहा वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत होते.
X वरील एका पोस्टनुसार 49 मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी 1 तास 22 मिनिटे लागणार असल्याचे Google Map दाखवत होता.
मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अन्य काही प्रवाशांनीही आपला राग व्यक्त केला आहे.
मिसिंग लिंकबद्दल ठाकरेंच्या आमदाराची मागणी
मुंबई-पुणे हे अंतर कमी करणारी मिसिंग लिंक उभारली जात आहे. याचे काम पूर्णत्वास आले असून या मिसिंग लिंकमुळे एक्सप्रेसवेवरील खंडाळ्याच्या घाटात होणारी वाहतूककोंडी यापुढे होणार नाही आणि मुंबई पुण्यातील अंतर कमी होईल असा दावा केला जात आहे. ही मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर त्यावरून पुढील सहा महिन्यांसाठी फक्त लहान वाहनेच जाऊ दिली जावीत, अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे. ही मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या एका पत्राद्वारे केली आहे.