Mumbai Rain : सध्या हवामानाचा काही नेम नाही. कधी पाऊस कोसळेल तर कधी कडक उकाडा... काहीच सांगता येत नाही. आज २७ जानेवारी रोजी सकाळच्या वेळेत अचानक पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. यंदा राज्यभरात चांगली थंडी पडली असताना अचानक पाऊस कसा आला, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. अचानक पाऊस कसा आला आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे यावर एक नजर टाकूया.
अचानक पावसाच्या सरी येण्याचं कारण काय?
आज पहाटे मुंबईसह ठाणे परिसरातील वातावरणात अचानक मोठा बदल पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा उकाडा आणि वाढत्या तापमानानंतर, आज सकाळी मुंबईतील अनेक भाग आणि ठाणे शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी हवामान खात्यानं यामागील वैज्ञानिक कारणांचा उलगडा केला आहे. वेस्टन डिस्टर्बन्समुळे हा अवकाळी पाऊस पडल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
येत्या काही दिवसात पुन्हा बरसणार...
पश्चिम भागातून येणारे कमी दाबाचे वारे हळू हळू पुढे सरकत आहेत आणि त्यामुळे कमी दबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईत अचानक पावसाच्या सरी बरसल्याचं सांगितलं जात आहे. हे वारे हिवाळ्यात उत्तरेच्या दिशेने वाहतात. त्यामुळे उत्तरेत हिवाळ्यात ही पाऊस पडतो. परंतु जर हे वारे उत्तरेकडून खालच्या दिशेने म्हणजे दक्षिणेकडे सरकले तर तिथे देखील पावसाच्या सरी बरसतात. आज सकाळी मुंबईत आणि ठाण्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या हे त्याचच उदाहरण. पुढचे एक ते दोन दिवस तापमानात घट होणार असून मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीचा अनुभव घेता येणार आहे. परंतु पुढील काही दिवसात पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टरबन्स म्हणजे पश्चिमेकडून कमी दाबाचे वारे वाहणार असून तेव्हा देखील हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अचानक आलेल्या पावसाने मुंबईकर सुखावले असले तरी सततच्या होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.