KDMC Exam : वाहतूक कोंडी ही राज्यातील सर्व महानगरांमध्ये नियमित घडणारी गोष्ट आहे. या कोंडीचा त्रास सामान्यांना नेहमी सहन करावा लागतो. रोज त्यांचे कित्येक तास वाहतूक कोंडीमध्ये वाया जातात. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे 150 विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित झाला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) विविध पदांसाठी भरती परीक्षा होती. त्यासाठी मुंबईच्या पवई भागात परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे वेळेवर न पोहोचल्यामुळे 150 हून अधिक उमेदवारांची ही परीक्षा हुकली. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्याने त्यांना आत प्रवेश दिला गेला नाही. यामुळे नाराज झालेल्या तरुण-तरुणींनी आपली परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी बुधवारी केडीएमसीच्या मुख्य कार्यालयात धाव घेतली.
नेमकं काय घडलं?
केडीएमसीमध्ये एकूण 490 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील अनेक भागांतून उमेदवार आले होते. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर, कर्जत, उल्हासनगर आणि खोपोली अशा दूरच्या ठिकाणांहून आलेल्या उमेदवारांसाठी पवईमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते.
कल्याणमध्ये राहणाऱ्या पूजा चौधरी या उमेदवाराने सांगितले की, "मी वेळेवर पोहोचण्यासाठी लवकर निघाले होते, पण वाहतूक कोंडीमुळे मला 5 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे मला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला नाही."
"मी फक्त 1 मिनिट उशिरा पोहोचलो, तरीही त्यांनी मला आत जाऊ दिले नाही. आमच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे, '' अशी भावना मयूर राठोड नावाच्या दुसऱ्या उमेदवाराने व्यक्त केली.
( नक्की वाचा : Patap Sarnaik : वाहनधारकांनो लक्ष द्या! PUC नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारचा मोठा निर्णय )
दिव्या सपकाळ या उमेदवाराने परीक्षा केंद्र शहराबाहेर ठेवण्यावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "कल्याण, डोंबिवलीसारख्या मध्यवर्ती शहरात परीक्षा केंद्र ठेवणे आवश्यक होते. पवईला परीक्षा केंद्र ठेवल्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास झाला आणि सुमारे 150 जणांची परीक्षा हुकली."
या उमेदवारांनी महापालिका प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची आणि त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केडीएमसीकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.