नवीन वर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या जल्लोषासाठी घराबाहेर पडणाऱ्या बेशिस्त आणि बेदरकार वाहनचालकांना आळा घालण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली जाते. दारू पिऊन गाडी चालवू नका असे सातत्याने आवाहनही वाहतूक पोलिसांकडून करण्यात येते. तपासणी मोहीम आणि वारंवार केल्या जाणाऱ्या आवाहनामुळे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रकार घडू नये यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये किती वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली याचा आकडा समोर आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये घट झाल्याचे दिसते आहे.
नक्की वाचा: बुलेट ट्रेनचा प्रवास आता स्वप्न नाही! 'या' दिवशी खरेदी करा पहिले तिकीट; वाचा सर्व माहिती
मुंबईत किती वाहनचालकांवर झाली कारवाई?
मुंबईमध्ये अंदाजे 100 ठिकाणी पोलिसांनी तपासणी पथके नेमली होती. वाहन चालक दारू पिऊन गाडी चालवत नाही ना ? याची ब्रेथ अॅनलायजरच्या मदतीने तपासणी केली जात होती. याशिवाय ट्रॅफीकच्या इतर नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याचीही पाहणी केली जात होती. मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबरच्या रात्री 13500 हून अधिक ई-चलन जारी केले असून या चलानची एकूण दंड रक्कम ही 1.3 कोटींच्या घरात आहे. मुंबई पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 211 चालकांविरोधात कारवाई केली आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी 333 चालकांवर दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल कारवाई केली होती. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जातो आणि त्याच्याविरोधात कोर्टात खटलाही दाखल केला जातो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना ही कारवाई महागात पडते. याची जाणीव झाल्याने दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नक्की वाचा: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच
मुंबईपेक्षा ड्रंक अँड ड्राईव्हचे ठाण्यात अधिक गुन्हे
मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईपेक्षा ठाण्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात कारवाई झाल्याचे प्रमाण अधिक आहे. ठाण्यामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 274 जणांविरोधा दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे, तर नवी मुंबईमध्ये 250 जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. सायन पनवेल महामार्ग आणि पाम बीच रोडवर वाहतूक पोलिसांनी मॅस्कॉट उभारले होते, ज्यांच्या माध्यमातून दारी पिऊन गाडी चालवू नका असे आवाहन करण्यात आले होते. ठाणे पोलीस दलाने 18 वाहतूक युनिट्सच्या मदतीने नाकाबंदी केली होती. कल्याणमध्ये सर्वाधिक तळीराम पकडले गेले असून तिथे ट्रिपल सीट प्रवास आणि वेगमर्यादा ओलांडणाऱ्या 45 चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.