Iconic New Yorker Restaurant in Mumbai's Chowpatty to Shut Down: मुंबईतील खवय्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. गेल्या 45 वर्षांपासून चौपाटीच्या गजबजलेल्या परिसरात असलेले 'न्यू यॉर्कर' हे प्रसिद्ध रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद होत आहे. 11 सप्टेंबर रोजी हे रेस्टॉरंट त्याचे दरवाजे कायमचे बंद करणार आहे.
इतिहासाची ओळख
टोनी बत्रा यांनी सुरू केलेले हे रेस्टॉरंट केवळ एक खाण्याची जागा नव्हती, तर मुंबईकरांसाठी आठवणींचा खजिना होता. येथील इटालियन, मेक्सिकन आणि भारतीय पदार्थ खूप लोकप्रिय होते. खास करून सिझलर्स, चीझी नाचोस आणि स्वादिष्ट संडेजमुळे अनेकांच्या बालपणाच्या आठवणी या रेस्टॉरंटशी जोडलेल्या आहेत.
मालक झाले भावूक
4 सप्टेंबर रोजी, रेस्टॉरंटचे सध्याचे मालक आणि टोनी बत्रा यांचे पुत्र रणबीर यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी न्यू यॉर्कर बंद होत असल्याची माहिती दिली. “आज मला मोठ्या दु:खद मनाने ही गोष्ट सांगावी लागत आहे की, 11 सप्टेंबर हा न्यू यॉर्करचा शेवटचा दिवस असेल,” असे त्यांनी लिहिले. “हे रेस्टॉरंट माझ्या जन्माच्या काही वर्षांपूर्वी सुरू झाले, म्हणजे जवळजवळ 45 वर्षांपूर्वी. माझ्या बालपणाच्या आणि आयुष्याच्या अनेक आठवणी इथे जोडलेल्या आहेत, त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.”
( नक्की वाचा : Mobile Numerology : तुमचा मोबाईल नंबर सांगतो तुमचं भविष्य! लग्न ते आरोग्य सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं )
काय आहे कारण?
रणबीर यांनी रेस्टॉरंट बंद होण्यामागे कोणतीही विशिष्ट कारणे सांगितली नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की, "काही अनपेक्षित आणि दुर्दैवी परिस्थितीमुळे आम्हाला हे दरवाजे बंद करावे लागत आहेत. पण हा शेवट नाही. आम्ही आशावादी आहोत. लवकरच डिलिव्हरी मॉडेलद्वारे आम्ही काही लोकप्रिय पदार्थ पुन्हा ग्राहकांपर्यंत पोहोचवू आणि भविष्यात न्यू यॉर्कर नव्या रूपात परत येईल."
ग्राहकांना भावना अनावर
सोशल मीडियावर ही बातमी आल्यानंतर मुंबईकरांना मोठा धक्का बसला. मुंबईकरांनी या रेस्टॉरंटबाबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. त्यामधील काही प्रमुख आठवणी खालीलप्रमाणे.....
"NOOOOOOOOOOO. ही माझ्या बालपणीची मुख्य आठवण आहे."
"खरंच असं वाटतंय की आपण आपल्या बालपणीच्या एका भागाला निरोप देत आहोत."
"मी पहिल्यांदा येथेच चीज सॉससोबत नाचोस खाल्ले होते."
"तुमची आठवण येईल आणि ती खूप मोठी पोकळी निर्माण करेल."
"इथल्या नाचोसची चव कोणीच देऊ शकत नाही."
नुकताच मुंबईतील आणखी एक प्रसिद्ध रेस्टॉरंट, वांद्रे पश्चिमेकडील सँडविच शॉप 'सांता मारिया' देखील बंद झाले होते. त्यापाठोपाठ न्यूयॉर्कर बंद होणे हा ग्राहकांसाठी धक्का आहे.