मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 प्रमुख जलाशयांपैकी एक असलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय आज (July 7, 2025) रोजी सुमारे 90 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वेगाने वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
( नक्की वाचा: नाशिकमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस! 5 धरण ओव्हरफ्लो )
मध्य वैतरणा धरणाची सद्यस्थिती अशी आहे
- धरण भरण्याची टक्केवारी: सुमारे 90 टक्के
- धरणाची पूर्ण भरलेली पातळी: 285 मीटर
- सध्याची पाण्याची पातळी: 282.13 मीटर
- उघडलेले दरवाजे: 3 दरवाजे क्रमांक 1, 3 आणि 5
- दरवाजे उघडण्याची वेळ: आज दुपारी 1 वाजून 15 मिनिटे
- पाण्याचा विसर्ग: 3000 क्युसेक वेगाने
धरणाचे 3 दरवाजे उघडले
सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 3 दरवाजे क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 5 आज दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी उघडण्यात आले. सद्यस्थितीत, या दरवाज्यांमधून 3000 क्युसेक वेगाने जल विसर्ग सुरू आहे. मध्य वैतरणा धरणातून सोडण्यात येणारे हे पाणी मोडक सागर जलाशय साठविले जाते, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
( नक्की वाचा: जायकवाडी धरण 50 टक्के भरले, पाणीटंचाईची चिंता मिटली! )
बृहन्मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात 2014 मध्ये मध्य वैतरणा धरण पूर्ण केले. महानगरपालिकेने हे धरण आपल्या स्वतःच्या खर्चाने विक्रमी वेळेत बांधले आहे. या धरणाची उंची 102.4 मीटर आणि लांबी 565 मीटर आहे. या जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता 19,353 कोटी लीटर इतकी आहे.
7 तलावांमध्ये 67.88 टक्के पाणीसाठा
मागील काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सातत्याने दमदार पाऊस होत असल्याने जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय पाणलोट क्षेत्रात 7 जुलैपर्यं 1,507 मिलीमीटर पाऊस झाला आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता 1,44,736.3 कोटी लीटर इतकी आहे. आज पहाटे 6 वाजताच्या मोजणीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व 7 तलावांमध्ये मिळून सुमारे 67.88 टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.