Mumbra Local Train Accident : मध्य रेल्वेवर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा हकनाक बळी गेला होता. कर्जतकडे जाणाऱ्या आणि कसाऱ्याहून निघालेल्या दोन समांतर लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासले गेल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात होतं. यानंतर मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक असलेल्या तीव्र वळणाबाबत (Local Accident) चर्चा सुरू झाली. या तीव्र वळणावेळी दोन्ही लोकलमधील अंतर कमी असल्याचं प्रवासी संघटनेकडूनही सांगितलं जात होतं. दरम्यान या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. एका प्रवाशामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Mumbra Accident)
मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वळण धोकादायक असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने वळणाच्या ठिकाणी दुर्घटनेच्या दोन दिवसांपूर्वी नवीन वेगमर्यादा लागू केली होती. मात्र हवेचा दाब, लोकलचा वेग, प्रवाशांचा तोल गेल्याने काही सेकंदाच्या घटनाक्रमाने मुंब्रा दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल एका आठवड्याभरात सादर केला जाणार आहे.
नक्की वाचा - Railway fare hike: रेल्वेचा प्रवास महागणार! 1 जुलैपासून भाडेवाढ, तिकीटाचे दर काय? वाचा एका क्लिकवर
तो प्रवासी ठरला अपघातासाठी कारणीभूत?
मुंब्रा दुर्घटना ही 9 जून रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. प्राथमिक तपासादरम्यान ही घटना काही सेकंदात घडल्याचे समोर आले आहे. तपास करत असताना सुरुवातीला सीसीटीव्ही चित्रण पाहण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेवेळी दोन्ही लोकलच्या दारात उभे असलेल्या प्रवाशांमध्ये फक्त 0.75 मीटर अंतर होते. सीएसएमटीहून कर्जतला जाणाऱ्या लोकलमधून एका प्रवाशाने हात बाहेर काढला होता. त्यानंतर त्याचा तोल गेला आणि तो लोकलमधून खाली पडला. यानंतर शेजारच्या लोकलमधील प्रवासी खाली पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.